गार जाहला चहा...

झाडली जमीन, झोपडीत टेकला जरा
आप-आपला चहा करून घेतला जरा

पाहता कपाकडे विचार साचले किती
थेंब लोचनांत बेसुमार साचले किती

काय लाभले इथे, कशास राहतो इथे?
का अनादरास येत जात साहतो इथे

जायचे तरी कुठे, कुणीच आपले नसे
काय नाइलाज हा, उधार हे जिणे असे

ताट ना हलायचे कधीच आपल्याविना
मी कधी न चाललो सलाम घेतल्याविना

आज सोहळ्यात मी न पाहिजे कुणासही
गाजतात सर्व, मी न आठवे कुणासही

आज झोपडीत या सबंध काळ आठवे
थाट आठवे जुना, जुना सुकाळ आठवे

राहिलो थिटा बघून सर्कशीत घातले
माय बाप लेकरास टाकुनी दुरावले

ओरडून अन रडून दर्शवे नकार मी
आपल्यांस वाटलो विकार, तुच्छ भार मी

"तू नकोस" बोलतात मायबाप लेकरा
जन्म भासतो अखंड एक शाप लेकरा

बॉस येत बोलला इथेच तू रहायचे 
उर्वरीत श्वास या इथेच घालवायचे

तडफडून शेवटी मनास मारलेच मी
हेच आपले नशीब, दैव मानलेच मी

रात्र रात्र जागुनी घरास आठवायचो
'न्या मला घरी' म्हणून एकटा रडायचो

सर्कशीत लोक चांगले असायचे खरे
जेव, झोप, शांत हो असे म्हणायचे खरे

यायचे, बघायचे, बरेच हासवायचे
लाडही करायचे, मजेत वागवायचे

लागलो रमायला हळूच सर्कशीत मी
येत राहिलो अता, जरा जरा खुषीत मी

खेळ पाहिले, अफाट साहसे असायची
सर्कशीत काय धीट माणसे असायची

मित्र जाहले हळूच त्यातले कुणीकुणी
लाभले पुन्हा जगात आपले कुणीकुणी

मी विदूषकांस पाहुनी किती हसायचो
पाहण्यास त्यांस मांड ठोकुनी बसायचो

एकदा कुणी म्हणे अता तुला शिकायचे
पाहतोस जे इथे तसे तुला करायचे

खूप वाटले बरे, मनात मी सुखावलो
धाडसी कुणी जणू क्षणामधेच जाहलो

कोणचा प्रकार यातला करायचा मला?
मी विचारताच बॉस खूप हासला मला

यातले तुला न एक कामही जमायचे
जोकरा तुला जगास फक्त हासवायचे

या जगात दुःख हे न लाभुदे कुणासही
आदरासहीत वागुदेत जोकरासही

मी नको म्हणून धावताच रोखती मला
लोक आपलेच ते, तरी दटावती मला

मी रडून, ओरडून हातपाय झाडले
पाहुनी मला तिथेच दोरखंड बांधले

खूप वेळ जाहला, तसेच ठेवले मला
जेवले तिथेच, ना कुणी विचारले मला

ऊन तापले तसे तहान लागली किती
आग जाहले शरीर, भूक पेटली किती

कळवळून बोललो विदूषकी करेन मी
जेवण्यास द्या मला, इथे असा मरेन मी

यापुढे कथा अशी धमाल होत चालली
काय वैभवे, यशे, कमाल होत चालली

सर्कशीत नाव एवढे प्रचंड जाहले
दुःख कालचे अता विरून थंड जाहले

फक्त पाहण्यास ते मलाच लोक यायचे
वाढले तिकीटही तरी खुशाल यायचे

मी कसा चढायचो, कसा पडून जायचो
हासहासता मधेच केवढा रडायचो

शेपटी जळायची, विजारही सुटायची
माकडे मला पिटून बाजुला पळायची

वाघ पाहुनी मधेच आपटायचो कधी
तोफ लावुनी हवेतही उडायचो कधी

सर्व लोक हासहासुनी तिथे दमायचे
सर्कशीत धन्य जाहलो असे म्हणायचे

मी प्रसिद्ध जाहलो लहानग्या मुलांमधे
आणि मुख्य तेथल्या जुन्या विदूषकांमधे

हासती बघून लोक वाटले बरे जरी
मुखवट्यात लोचनांस येत जायच्या सरी

जाहिरातिला प्रमूख नाव लागले अता
सर्कशीस आपलेच नाव लावले अता

काय सर्कशीत मान, काय मान एरवी
मी जरी लहान, मीच बस महान एरवी

'काय पाहिजे तुला' अता मला विचारती
येत जात सर्व माणसे सलाम मारती

जाहला पगारही सुरू मला हळूहळू
आणि तो पगार वाढु लागला हळूहळू

बॉस लाडका म्हणेल काय त्यासही कमी?
काय जे हवे असेल ते मिळेल ही हमी

सर्कशीसही बराच फायदा मिळायचा
त्यात मुख्य भाग माझियामुळे असायचा

झोपडी न राहिली, घरात ठेवले अता
साथ देत त्या घरात बॉस जेवले अता

हा सुवर्णकाळ तीस वर्ष चालला असे
त्यात मी फिरून सर्व देश पाहिला असे

काळ थांबतो कुठे? पुढेच जात राहतो
मात्र तोच, तोच फक्त या मनात राहतो

सर्कशीत एकदा असेच खेळ खेळलो
मागणी म्हणून मी बराच वेळ खेळलो

तोफ लावली जशी, खुशाल आत पोचलो
नेहमीपरी हवेत जात मी सुसाटलो

आज नेहमीपरी न गवत ठेवले तिथे
विसरुनी कुणीतरी कपाट ठेवले तिथे

कोसळून मी तिथे खरीच बोंब मारली
वाटुनी विनोद माणसे खरीच हासली

हाड मोडले, जमाव घेत चालला मला
वैद्य बोलला, "पुरा प्रकार संपला' मला

"यापुढे न तू कधीच भाग घ्यायचास रे
 जाउनी खुशाल आज सांग मालकास रे"

सांगता तसे, बरेच लोक सांत्वने करी
बॉस बोलला, रडू नको, मनास सावरी

काय कल्पना असे मधेच व्हायचे असे?
मी रडूण बोललो पुढे जगायचे कसे?

लोक रोज चौकशी करून जायचे तरी
जेव, झोप, घे दवा असे म्हणायचे तरी

बॉसही तसा बघून जायचा कधीकधी
जेवण्यास तो घरात न्यायचा कधीकधी

संपली जरूर की हळूच प्रेम आटते
तोच लाडका अता हळूच धोंड वाटते

रोड जाहली अता हळूच चौकशी जरा
लोक लागले म्हणावयास वाटशी बरा

भार होत चाललो असाच सर्कशीस मी
रात्र रात्र एकताच भिजवुनी उशीस मी

त्यात बोलले कुणी पगार यास का बरे?
बॉस बोललाच "तूच बोलतोस ते खरे"

थांबला पगार, फक्त अन्न येत राहिले
रंग जीवनात भिन्न भिन्न येत राहिले

त्यातही उपासमार जाहली सुरू अता
अन्न कालचेच आज लागले पुरू अता

मागताच काम बॉस बोलला मला कसा
झाड सर्व झोपड्यांस शब्द झोंबला कसा

आज सर्व झोपड्या करून स्वच्छ राहतो
राज्य वाढवून त्यात मीच तुच्छ राहतो

..........

तेवढ्यात आठवे कपात घेतला चहा
आठवून सर्व दुःख गार जाहला चहा