मारवा

अटळपणे ही प्रभात आली

खिन्न पावली उमटेल दुपार

कपच्या कपच्या उडवित बसलो

तरीही उरे एक कपार ।।

डोंगर भवती, भवती झाडे

सारे काही तेच तेच ते

विषण्ण मनाचे तुकडे पाडित

तीक्ष्ण ती स्मृती सदैव रुपते ॥

तेच उसासे, निःश्वास विखारी

मजला जाळित जाळित जाती

भंगुर देहा सूर्य स्पर्शता

बाकी उरते चिमूट माती ॥

चिमूट मातित प्राण फुंकता

विस्फोटती इंद्रधनूचे रंग

स्वरावलींचे प्रतिरूप निरखिता

जाहला मारवा आत्मदंग ॥