गडद निळे नभ माथ्यावरती
अंधुक फुलती तेजपिसारे
नित्य नव्हे हे, जरा वेगळे
तिमिराने गिळले हे जग सारे ॥
दाट कृष्ण हा पडदा फाडुनी
तलवार तेजोनिधीची चमके
क्षणात त्याला बोथट करिते
अंधाराचे रितेच मडके ॥
खळखळत्या प्रवाहास अडवुनी
उभा ठाकला कभिन्न फत्तर
त्यावर माथा फोडुनि घेणे
हे तर नव्हेच तयास उत्तर ॥
सर्पासम प्रश्न वेटाळुनि बसती
श्वास रोधुनि जीव घुसमटे
लढा देउनि मन अखेर थकले
मग पाउल कळिकाळाचे उमटे ॥
शरीर अन मन एक की भिन्न
तत्त्वज्ञानी रटाळ चिंतन
आणिक कोणी ठाम सांगती
अटळ आहे अखेर प्राक्तन ॥
हस्तरेषा या कशा उमटल्या
खरेच का त्या काही सांगती
अनंत ग्रह हे अवकाशामध्ये
नऊच मग का मोजले जाती ॥
एक स्वप्न हे जरा उमटले
फिकट तयावरि रंग पसरले
क्षणात सगळा विस्कोट झाला
बघणारा अन स्वप्न विलयास गेले ॥