खात्यात ठेव होती बस जेमतेम तेव्हा
दोघे गरीब होतो, श्रीमंत प्रेम तेव्हा
आलीस या घरी तू, घरपण घरास आले
म्हणतात घर कशाला, तेव्हा मला कळाले
आई, वडील माझे होते थकून गेले
पाहून पण सुनेला झाले नवे नवेले
उत्साह वाहणारा, साऱ्या घरात होता
विश्वास जिंकण्याचा माझ्या मनात होता
मी स्पर्शणे तुला अन, धास्तीत टाळणे तू
पाहून धैर्य माझे, हासून भाळणे तू
"सारे घरात असती, तू सोड हात माझा"
होणे अधीर माझे, चोळून हात माझा
संपायचीच नाहित कामे घरातली ती
बेचैनशी करे मज, इच्छा मनातली ती
येऊन हासणे तू, खोटे रुसून मीही
गोडीत आणणे तू, ये रसरसून मीही
शृंगार चाललेला तारीख बदलणारा
'उगवायचे कधी ते' सुर्यास शिकवणारा
खोल्या अडीच केवळ प्रेमास व्यापणाऱ्या
मज्जाव त्यातही पण दु:खास आटणाऱ्या
कष्टात प्रेम होते, कष्टात आपलेपण
जे जे घडायचे ते, त्याच्यात आपलेपण
ओढून चुंबुनी तुज कामास जायचो मी
होती सवय तुलाही त्याची, बघायचो मी
कामावरून येता, दारात हासणे तू
या कष्टल्या मनाला आराम भासणे तू
साधा चहाच होता पण औषधापरी तो
गप्पा कितीक घडवे साध्या कपावरी तो
"कामात लक्ष नव्हते" सांगायचे तुला मी
खुष व्हायचीस इतकी, पाहायचे तुला मी
सारे पदार्थ करणे समजून आवडींना
आस्वाद साखरेचा साऱ्या घडीघडींना
हॉटेलखर्च तेव्हा कोणास परवडावा?
पण स्वाद तेथलाही रोजी घरी घडावा
ना सांगता तुला मी साडी नवीन घेणे
लटकाच राग तेव्हा तू आवरून घेणे
कानातले जुने ते बस वीस रूपड्यांचे
तू मानणे तरीही त्यालाच कंचनाचे
फिरण्यात अर्थ म्हणजे 'बागेत फक्त जाणे'
आणि कसेतरी ते घेणे चणे फुटाणे
पण त्या हजार गप्पा, त्या योजना हजारो
श्रीमंत व्हावयाच्या संकल्पना हजारो
तक्रार सासऱ्यांची प्रेमात सांगणे तू
आईठिकाणि अपुल्या सासूस मानणे तू
समजावणे तुला मी, घेणेस समजुनी तू
झाले घरात जे जे, देणेस सोडुनी तू
'मिळणार काय बढती' याचा विचार सारा
दिवसात वीस केवळ संपे पगार सारा
भाडे, दुधे, किराणा, पेपर, बिले विजेची
इतकाच खर्च तेव्हा बाजू बने जमेची
नात्यातले कुणी जर आले घरी कधीही
सारी परिस्थिती ते समजून घ्यायचेही
तरिही अगत्य होते, काही कमी न होते
'जाणार लोक केव्हा', असले मनी न होते
साहेब कंपनीचे आमंत्रणास आले
घरचेच कार्य त्यांच्या, पार्टीस या म्हणाले
तेव्हाच एकदा मी तो पेग घेतलेला
अन तू हळूच येउन हासून फेकलेला
हासून गाठता घर, गोडीत तू म्हणावे
याच्यापुढे कधीही असले न तू करावे
मीही तुला चिडवणे, अभिनय उगाच करणे
चालून वाकडा मी खुर्चीत धप्प पडणे
सारे तुला समजणे, भरपूर हासणे तू
हसताच मी जरासा, पाणीच टाकणे तू
आनंद काय होता, तो सोहळाच होता
तो काळ जीवनाचा बस आगळाच होता
ती गोड बातमीशी लाजून सांगणे तू
आणि हळूच माझा आनंद पाहणे तू
घेणे मिठीत तुजला, लज्जेत हासणे तू
ना संपत्या सुखाची बस खाण भासणे तू
जे जे करायचे ते मीही जपून करणे
पुसणे तुझीच इच्छा, इच्छेस पूर्ण करणे
तो खर्च हॉस्पिटलचा ना परवडे तरीही
तक्रार ना मला अन कुरकुर ना तुझीही
वेलीस फूल येता झाला शकुन काही
बढती मला मिळाली, हो दैवही प्रवाही
झाला प्रवास चालू, पैशात लोळण्याचा
अन भूतकाळ सारा, पैशात घोळण्याचा
लग्नास आज अपुल्या ही वीस वर्ष झाली
इच्छा- वरात अपुली कुठल्याकुठे निघाली
कामात फक्त मी अन तू मंडळात बीझी
वाटे तुला मला हे जीवन असेच ईझी
मी रोज ड्रिंक घेणे, तक्रार ना तुलाही
मी रोज लेट येणे, तक्रार ना तुलाही
मुलगा जगात त्याच्या, मीही जगात माझ्या
हे तीन लोक परके, असती घरात माझ्या
चिडचिड राहिलेली नात्यात फक्त आहे
नाती म्हणावयाला, गोडी विरक्त आहे
हा दोष ना तुझाही, माझी न चूक काही
पण भेटण्यात आता ती गोड भूक नाही
कामास आज जातो, सांगून जात नाही
मी घ्यायचो कधी ते, चुंबन मनात नाही
येतो घरात तेव्हा तेथे कुलूप असते
मी टाकतो चहा पण, इच्छा मुळीच नसते
दौरे बरेच करतो, अन एक फोन करतो
किरकोळ बोलतो अन मी फोन बंद करतो
तू काढतेस सहली, भारत फिरून येशी
इतकी सहज खरेदी हल्ली करून येशी
हल्ली बिले किराणा झटक्यात पेड होते
झाडून बंगला हा श्रीमंत मेड होते
मी आणली तुला ती साडी जुनी अताशा
नेसून कामवाली कामे करी अताशा
कानातले मिळाले कप्प्यात एक मजला
पाहून काळ अपुला माझ्या मनात सजला
म्हणलीस तू मला ते फेकून द्या कधीचे
मी ठेवले परंतु कप्प्यात त्या कधीचे
हा तोच बाळ अपुला येणार जो म्हणूनी
मी तू जपायचो ना स्वप्ने किती विणूनी
एकत्र जेवणेही हो योजनाच आता
'गप्पा उदंद मारू' संकल्पनाच आता
आईवडील आता नाहीत पाहण्याला
तक्रार मात्र त्यांची मिळतेच ऐकण्याला
समजूत घालणे मी आता करीत नाही
कोणी अता अबोला खोटा धरीत नाही
बॅकेत ठेव आहे अपुली पिढ्यापिढ्यांची
आणि मनात नाती केवळ तड्यातड्यांची
खात्यात ठेव होती बस जेमतेम तेव्हा
दोघे गरीब होतो, श्रीमंत प्रेम तेव्हा
श्रीमंत प्रेम तेव्हा...