साचा

साचेबंद आयुष्याला तोडून
मी बाहेर आलो
साचा मोडला व ठिकऱ्या झाल्या
मग त्यावर थुंकून मी म्हणालो
"मला साचा हवा"
साच्याचा आधार कसा पक्का असतो.
बाहेरच्या हवेचे परिणाम नाहीत
बाहेरच्या मूर्खांचे शाप नाहीत
साच्यातल्या साच्यात होतात तयार
साचेबंद नवीन पिढ्या
साच्यातच मरतात पाय लांबवून
आणि प्रेते बाहेर काढतांना
साच्यात अडकतात

आता मला डीझेल नको
इलेक्ट्रिक भट्टी नको.
मंत्राग्नी हवा, भटजी हवा,
पिंडाला कावळा शिवायला हवा
हे सर्व पाहून भटजी म्हणतो
अहो हा पण साच्याचाच प्रकार
तुम्ही तरी कोठून घेणार जगावेगळा आकार?
साचेबंद जगात साचा सोडून कसे जमावे?

त्याच्या प्रश्नांना उत्तर नाही
साच्यातले उत्तर तयार आहे, आणि अपेक्षितही

साचा सोडू नका,
रांग मोडू नका,
रांगेचा फायदा सर्वांना
साच्याचा फायदा सर्वांना.