निसर्गाने दिलेले दान जेव्हा अधिर झाले
तूं मला अन् मी तुला सम सामावून घेतले ॥
अपुल्याकडोनी हवे होते ते तयाने साधले
वेगळाल्या वलयी पुन्हा कोंडूनी आम्हा टाकले ॥
मातृत्वातची तूं स्वतःला विरघळवूनी घेतले
विरंगुळा शोधताना परी मन माझे भरकटले ॥
जाग येता तुला कधी वलय तुझे धास्तावले
वलयात अन् शिरुनि माझ्या मनास तूं चुचकारले ॥
वलय तिसरेही निरागस अपुल्या वलयी तरंगले
निसर्गाने दिले दान पुन्हा निखळ आनंदाचे लेणे ॥