स्मशानातील अधिकारी व श्राद्धाचे गुरुजी विरुद्ध गेलेल्याचा मित्रः
( अधिकाऱ्याला 'अ' हे अक्षर, मित्राला 'मि' अन गुरुजींना 'गु' हे अक्षर! )
मि - माझा मित्र गेलाय... तर... आत्ता ...
अ - बॉडी कुठाय?
मि - बॉडी?
अ - तुमच्या मित्राची बॉडी कुठंय?
मि - ती घरीय
अ - आणा!
मि - आत्ता आणली तर चालेल का? आपलं... आणलं तर चालेल का? लगेच येईल, अर्ध्या तासात!
अ - केव्हाही आणा!
मि - गुरुजी आहेत का?
अ - बोलवावे लागतील.
मि - बोलवता का?
अ - कोण गेलंय?
मि - माझा मित्र गेलाय!
अ - मग तुम्ही बोलवा!
मि - नंबर द्या ना?
अ - ९८३३३४४५०४
मि - हॅलो? गुरुजी का?
गु - होय
मि - मी स्मशानातून बोलतोय..
गु - सगळे तिथूनच बोलतात... बोला
मि - माझा मित्र गेलाय!
गु - बर!
मि - तर तुम्ही येऊ शकाल का?
गु - सातशे रुपये होतात.
मि - हो
गु - सवाष्ण होता का?
मि - कोण?
गु - तुमचा मित्र?
मि - मित्र कसा सवाष्ण असेल?
गु - मग काय होता?
मि - काय होता म्हणजे?
गु - विधूर वगैरे होता का?
मि - तो अविवाहीत होता
गु - अग्नी कोण देणार आहे?
मि - मीच!
गु - दहाव्वा, बाराव्वा करणार आहात का?
मि - ते ठरलेले नाही.
गु - मग दुसरे गुरुजी बघा!
मि - का?
गु - मी टोटल पॅकेज घेतो.
मि - अहो पॅकेज ठरलेच नाहीयेना अजून?
गु - कोण ठरवणार आहे?
मि - आम्हीच मित्र मित्र!
गु - का? घरचे कोणी नाहीये का?
मि - तो एकटाच होता.
गु - अशी केस मी घेत नाही.
मि - अशी म्हणजे?
गु - एकटाच लेकाचा कुणी मेला तर ती केस घेत नाही मी!
मि - का? माणूस एकटाच मरणार की?
गु - मग पैसे कोण देणार?
मि - अहो मी देईन ना?
गु - अस्थी लागणार आहेत का?
मि - का?
गु - तुम्हाला नको असल्या तर आम्हाला लागतात. हव्या असल्या तर वेगळा चार्ज आहे.
मि - तुम्हाला कशाला अस्थी लागतात?
गु - काहीकाहींच्या मिळतच नाहीत त्यांच्या आहेत असे दाखवतो आम्ही.
मि - अस्थी मिळत नाहीत?
गु - वय झालेले असते. जळतात!
मि - नाही नाही! आम्हाला हव्या आहेत.
गु - कसे गेले?
मि - अचानक गेले.
गु - अचानक जाउदे नाहीतर घोषणा करून जाउदे? गेले कसे?
मि - म्हणजे?
गु - नैसर्गीक मृत्यू आहे का?
मि - हो मग?
गु - कशाने गेले?
मि - काल खूप प्यायला. ओकला. तिथेच गेला.
गु - दाखला आहे का?
मि - कसला?
गु - डॉक्टरचा? 'नैसर्गीक मेला' असा?
मि - काढलाय!
गु - पंचक वगैरे लागलंय का?
मि - काही लागलेले नव्हते. नुसताच गेला.
गु - अहो... पंचक लागलय का? वेळ बघितली का?
मि - नाही बघितली. किती वाजता पंचक लागतं?
गु - मला वेळ बघावी लागेल. पंचक लागले असेल तर शांत करावी लागते.
मि - शांत? नाही नाही! त्याला एकक लागलय! पाहिले आम्ही!
गु - एकक म्हणजे?
मि - म्हणजे ते ज्याला लागतं तो एकटाच जातो. बाकी कुणी जात नाही.
गु - असे एकक वगैरे लागत नाही.
मि - बर तुम्ही या तर खरं?
गु - लाईट आहेत का?
मि - आहेत.
गु - रडणारे किती आहेत?
मि - का?
गु - रडणारे जास्त असतील तर विधीला वेळ लागतो. १५ % जास्त चार्ज होतो. मला इतर बॉडीज असतात नंतर!
मि - कुणीही रडणार नाही.
गु - दोन तासांनी येतो. बॉडी त्यावेळेस तिथे पाहिजे.
मि - ओके. या!
अ - काय म्हणले गुरुजी?
मि - येतायत म्हणले.
अ - किती म्हणाले?
मि - दोन तासात.
अ - काय दोन तासात?
मि - येतो म्हणाले.
अ - चार्ज किती म्हणाले?
मि - सातशे
अ - तिच्यायला! साल्याला सांगीतले आठशे घे, शंभर बॉडीमागे मला दे... तर ऐकत नाही.
मि - काय?????
अ - हा या इथे पलीकडाच्या खोलीत बसलाय बघा तो. म्हणे दोन तासात येतो. अन सहाशे द्या, नाहीतर म्हणाव यापुढे मी बॉडीच देणार नाही.
संवाद समाप्त!