पहिल्या श्वासापूर्वी
सचेतन शब्दशून्यता
गात्रांची शयनशीलता ।
पहिल्या श्वासानंतर
मिटल्या डोळ्यांच्यामागे
अंधाराचं अधिराज्य
उमलत्या प्रकाशाचं भय ।
पहिल्या श्वासानंतर
गात्रांना जाग
जीवनाचं स्वागत करणारं रुदन
सभोवती उमलणारा आनंद
रेशमबंधांई नवी गुंफण ॥
अंतिम श्वासापूर्वी
अर्धचेतन शब्दशून्यता
गात्रांची बलहीनता ।
अंतिम श्वासापूर्वी
मिटल्या डोळ्यांच्या मागे
अनुपम प्रकाशाचं आवाहन
निर्भय प्रवासाची ओढ
जीवननिरोपाची उलघाल ।
अंतिम श्वासानंतर
आक्रसणारी खिन्नता सभोवती
कोमेजलेली मने
व्यक्त अव्यक्त आक्रंदन
रेशमबंधांचं समर्पण ॥