आकाशाचं देणं

शब्द-

आकाशाचं देणं

ध्वनीचं लेणं

भावनांचं हुंकारणं

संवादाचं साकारणं ॥

शब्द-

कुणासाठी चेतना

कुणासाठी प्रेरणा

कुणासाठी बहाणा

कुणासाठी वंचना ॥

शब्द-

कधी सुखाचा

कधी यातनेचा

कधी फुकाचा

कधी लाखमोलाचा ॥

शब्द-

क्रोधात झोंबणारा

दुःखात हळहळणारा

शृंगारात झंकारणारा

आनंदात ओसंडणारा ॥

शब्द-

प्रेमाचा - चिंब भिजलेला

द्वेषाचा - करपलेला

मैत्रीचा - गोडावलेला

सहानुभूतीचा - स्नेहाळलेला ॥

शब्द-

लेखणींनं विद्ध

अक्षरात बद्ध

साधनेनं सिद्ध

ऐश्वर्यांनं शुद्ध -

मुक्तीचा मंत्र ॥