विनोदाचा विषय मी

कुचेष्टेचा मलय मी
विनोदाचा विषय मी

फुकाचा गर्व सारा, सदा वरतीच पारा
असावे की नसावे, दुभाजक निंदणारा

कधी उपयोग होतो, गटांच्या रंजनाला
कधी धावून जातो, कुणाच्या वंदनाला

असत्याचा उदय मी
विनोदाचा विषय मी

असामान्यात साऱ्या उडी घेऊन झाली
स्वतःच्या मूर्खतेला प्रसिद्धीही मिळाली

जिथे जाईन तेथे, जगाला त्रास झाला
अता तर घाबरासा स्वतःचा श्वास झाला

कुठे मागू अभय मी?
विनोदाचा विषय मी

स्वतः मी एकदाही नसे फंदात पडलो
कुणी ओढून नेले, तसा मोहात पडलो

पुढे मग वार झाले, हसे झाले भयानक
कुणावर प्रेम केले, बदलला तो अचानक

अताशा दु:खमय मी
विनोदाचा विषय मी

स्वतःच्या हिम्मतीने इथे मी पोचलोसे
गुरू, चेला न कोणी तरीही चाललोसे

पुढे जाणार आहे, तिचा होणार आहे
मला माझीच कविता, अता म्हणणार आहे

"विनोदाचा विषय तू?...
अता हे सोड भय तू"