एक झोपडी - १९८६

एक झोपडी, माणसे सहा, त्यातही पिढ्या तीन वेगळ्या
आजच्या कळ्या दोन, वाळक्या दोन, मोकळ्या दोन पाकळ्या

आठ कोंबड्या, चार मेंढरे, एक गाय अन एक वासरू
दोन श्वानही, दोन मांजरे, चार पारवे, एक कोकरू

डोंगरातली एक ती दरी, त्या दरीतही दौलती किती
शांतता किती, रम्यता किती, तुष्टता किती, सवलती किती

घाट वाकडा, वाट ही नसे, कोण यायचे आसपासही?
पंचकोसही आठ कोस अन ऐकु यायचे तेथ श्वासही

फुंकतो विडी एक वृद्धसा, एक पोरगा खेकडे धरी
पोरगी धरे वांड कोकरू, घोंगडी विणे जख्ख शेवरी

दादला धरे रानचे ससे, कारभारणी चूल फुंकते
पोर ढुंकते, श्वान भुंकते, जख्ख शेवरी चूळ थुंकते

काळ जेवढा सूर्य काढतो, काळ तेवढा वीज काढते
मावळायला दीस संपतो अन उजाडले की उजाडते

साप चावतो, मंत्र लागतो, अन विषातला जीव संपतो
रोग लागता, लागते बुटी, नाम घेउनी रोग संपतो

रानची फळे, रानची फुले, दादला कुठे ये विकूनसा
कापडे, चणे, शेव, पापडी, मीठ, जोंधळे ये करूनसा

काय नोकरी, काय शिक्षणे, केवढी घरे, दौलती तुझ्या
काय लागते रे जगायला? हा निसर्गसे संगती तुझ्या

एकदाच त्या झोपडीमधे टेकलो जरासा थकून मी
शांतता तशी त्यापुढे पुन्हा वाटली न एवढा जगून मी

आज जी सुखे लाभतात ती शुन्य त्या जुन्या झोपडीपुढे
आज देह हा वावरे इथे आणि मन कुण्या झोपडीपुढे......

( १९८६ साली केलेल्या ट्रेकमधील सिंहगड राजगड या पहिल्या टप्प्यात भुतोंडे ते कुंभेळे या वाटचालीत 'कावळा' घाट उतरल्यावर एक झोपडी लागली होती. त्या खऱ्याखुऱ्या झोपडीचे हे वर्णन आहे. 'वर्णन' हा या रचनेचा एकमेव हेतू आहे. )