स्वप्नात नहालेली पहाट दवात ओली
पानात श्वास येती न कळे कोणत्या उपायी
मग सांगते मला ती कथा सुमन मनांच्या
रात्रीत दुःख सारे मिटवून घेतल्याच्या
आकाश साजरी निळाई अन् गर्भकांतीची वनराई
हाच तो शब्द पाखरांचा, राहे सदा अनामी
इथल्या दिशा प्रवाही, नेती मज दूरच्या किनारी
मी वंचनाच माझी, जाणतो मग मी अंतरी
कुठल्या वेगे कसल्या योगे मिसळती पावलांच्या खुणा
मार्ग एकच आरंभीचा अन् चकवा पुन्हा पुन्हा
कसले निदान नाही न कसली अभिलाषा
ही तृप्त कामना की रित्या मनाची भाषा?
ही वेळ अवचित येते, बांधून धागे जाते
मुक्त विराणी जणू योग्याची, संपता संपता ऐकू येते
क्षितिजावरती रंग शिंपती, दिवसाचे हे दूत उभे
पहाट भोळी विरून जाई, ठेवून मागे मुग्ध कौतुके