पुन्हा पाणी दे !

पुन्हा पाणी दे !  पुन्हा  पाणी दे!!
तगमग या जीवांची विलयाला ने

वाट पाहताना सारे जग झाले जुने
कोरडेच नदीनाले  आभाळही सुने
सरीतून  अमृताच्या  संजीवन  दे!
पुन्हा पाणी दे !  पुन्हा  पाणी दे!!

स्पर्श तुझा परीसाचा जणू नवलाई
थेंबातून  डोकावेल  गर्द  हिरवाई
सृष्टीला या चैतन्याचा नवा रंग दे!
पुन्हा पाणी दे !  पुन्हा  पाणी दे!!

नको लावू वेळ आता तुटेल ही आस
उरामध्ये  उरलेला  शेवटचा श्वास
रूप  मेघाचे  घेऊन कृष्णवर्णी ये
पुन्हा पाणी दे !  पुन्हा  पाणी दे!!