परत परत तेच तेच, तेच तेच परत परत,
मनामध्ये अविरत, राहते फिरत फिरत. ॥ १ ॥
प्रसंग जुने झाले तरी, आठवणी त्या ओलसर,
शब्द पोचूनी खोलवर, राहतात झुरत झुरत. ॥ २ ॥
तीच तीच माणसं, मनात जणू पाळलेली,
असताना, नसताना, बोलतात सतत सतत. ॥ ३ ॥
वसती मनाच्या घरात, बोलती रागाच्या भरात,
तरी घ्यावं पुन्हा मनात, आवंढे गिळत गिळत. ॥ ४ ॥
दूरवरचं कौतुक फार, जवळच्यांना जिव्हेची धार,
घरात असूनी निराधार, जगावं हेवा करत करत. ॥ ५ ॥
बिनसलेलं कधी कुणी, अचानक येता समोरुनी,
टाळता न आल्यास, पाहावं खोटं हसत हसत. ॥ ६ ॥
हवहवसं कधी कुणी, दूर राहता ओढ लावूनी,
अवचित लागता चाहूल, भेट होते रडत रडत. ॥ ७ ॥
नाती असतात कशी? गवताची पातीच जशी!
शब्दांच्या पावसात, रुजतात सलत सलत. ॥ ८ ॥
एकीकडे लाविता ठिगळ, दुसरीकडे असते उसवत,
वस्त्र नात्यांचे सांभाळता, मन जातं क्षिणत क्षिणत. ॥ ९ ॥
मोक्ष नाही लोभ द्वेषा, बाळांसंगे पुनरपी उषा,
नि:श्वास शेवटचा येता, मात्र जाती सरत सरत. ॥ १० ॥
सत्य हेच सांगते का? लाल ठिणग्यांची चटचट,
चिता जेव्हा विझत जाते, काळासंगे जळत जळत. ॥ ११ ॥
- अनुबंध