दिला तुला जो खेळ बापड्या
नीट जरा तू खेळ गड्या
रंजन माझे झाले उत्तम
तरच देइन गाणे तुजला
म्हण हासुनी ते नीटपणे
सुरात, स्वरात, रागदारीत
प्रेमाने मग मला रिझवी तू
नाचून असे तालात वरी तू
श्रांत क्लांत मी सृष्टी रचूनी
स्वस्थ बैसलो क्षीरसागरी
अंत सृष्टिचा होण्याआधी
रंजन माझे पूर्ण करी
नवी सृष्टी , नवा खेळ
हाच माझा छंद असे
पुन्हा पुन्हा पाचारण तुजला
जन्मोजन्मी मुक्ती नसे
मोक्ष मुक्ति हा खेळ केवळ
ते वेगळे माझे दालन
त्या मंचावरी साधुजनांचे
कीर्तन चाले अध्यात्माचे
खिन्नपणाने नको विस्कटू
मी दिलेला रोल फिस्कटू
दुसरा रोल मागू नको तू
त्याला सोपा म्हणू नको तू