होती रात्र प्रसन्न, शरदाच्या चांदण्याची
पाहत होतो नभाकडे, रंगत कुतुहलाची
झगमगत होती नभात,रोषणाई ताऱ्यांची
समाधान वाटे पाहून,नवलाई निसर्गाची
होतो पाहत मी, विश्वकर्म्याची करामत
झुंबर चंद्राचे सुंदर, टांगले होते नभात
लोलक चांदण्यांचे, बाजूस हे दिमाखात
सजले होते छत, चमकत्या त्या ताऱ्यात
मंद शांत रोहिणी, चमकते कशी नभात
करते ती चंद्रास, आपुल्याकडे आकर्षित
दोघेही पडले होते, एकमेकांच्या प्रेमात
हास्य पसरले चंद्राचे,चांदण्याच्या रुपात
मारते मदनबाण,चंद्रास चांदणी व्याधाची
कल्पनाही नव्हती चंद्रास,त्याच्या कटाची
चाखत होता धुंदी,तो रोहिणीच्या प्रेमाची
दखल नसे जवळून गेल्या आकाशगंगेची
पाहुनी उत्कट प्रेम, असे चंद्र रोहिणीचे
आशिर्वाद देती दोघास,सप्तर्षी हो नभाचे
सफल होई प्रेम,साक्षीने सत्तावीस नक्षत्रांचे
चालले कथानक प्रेमाचे, शांततेत पहाटेचे