सुजय स्वस्त घर योजनेमधे स्वयंसेवक म्हणून काम करायचा. त्याला अभिबद्दल प्रचंड आदर होता. अभिलाही त्याचं खूप कौतुक होतं. नोकरी, म्हातारे आइवडील सगळ्यांना सांभाळून, बहिणींच्या शिक्षाणाची पूर्ण जबाबदारी घेऊन सुजय एम. आर्च. करत होता. शिवाय ह्या योजनेसाठीही काम करत होता. शंका विचारायला, ड्रॉइंग, मॉडेल्स दाखवायला, परीक्षेच्या आधी नमस्कार करायला तो अभि प्रतिभाच्या घरीही नेहमी जायचा. यश, अस्मिपैकी कोणीच आर्किटेक्चरला गेले नव्ह्ते, यशने आर्किटेक्ट व्हावे असं अभिला मनातल्या मनात वाटायचं पण त्यानेही अस्मि प्रमाणे इंजिनियरिंगला जायचं ठरवून टाकल्याने अभिने त्याच्यावर स्वतःची इच्छा लादली नाही. त्यामुळेही सुजयबद्दल अभिला एक वेगळी आपुलकी वाटत असे. अभिनी जी वाट्टेल ती मदत माग असं सुजयला सांगितल होतं तेव्हा त्यानं सुप्रियाबद्दल सांगितलं. ती वेगळ्या जातीची होती त्यामुळे सुप्रियाच्या घरून त्यांच्या लग्नाला संमती मिळत नव्ह्ती. अभि सुप्रियाच्या घरी जाऊन तिच्या आईवडीलांशी बोलून आला. त्यांना सगळं काही सांगूनही त्यांनी फक्त जातीच्या कारणासाठी लग्नाला संमती दिली नाहीच तेव्हा सुप्रियाचे कन्यादान अभि, प्रतिभाने केलं. शिवाय लग्नाचा निम्मा खर्चही केला. तेव्हापासून सुप्रिया, सुजयनेही अभिला ‘बाबा’ म्हणायला सुरवात केली. प्रतिभाला मात्र तो मॅडमचं म्हणायचा. अभिलाही सुजय जवळचा होता.
लग्नानंतर काही दिवसांनी सुजय सुप्रियांनी सगळ्यांना जेवायला बोलावलं होतं. अभिचे नेह्मीप्रमाणे,"तुम्ही व्हा पुढे, मी एवढे डिझाईन रिव्ह्यू करून येतो." प्रतिभा, यश, अस्मि सगळे पुढे गेले, जेवण चालू झालं आणि यशच्या मोबाईलवर फोन. अभिला येता येता ऍक्सिडेंट झाला होता आणि हॉस्पीटलमध्ये नेलं होतं. सगळे धावतच पोचले, तोपर्यंत अभिची रवानगी आय. सी. यू. मध्ये झाली होती. धावत जाऊन प्रतिभानं अभिचा हात धरला.
"पोचलीस, बर झालं. मला वाटलं आपली भेट आता होते की नाही. शिवाय तू वडाची पूजाही करत नाहीस... त्यामुळे पुढच्या जन्मीचा पण चान्स नाही..... "
"वाट्टेल ते काय बोलतोयस अभि? थट्टा सुचतीय तुला? मला एवढी भीती वाटतीय, पायातली सगळी शक्तीच निघून गेल्यासारखं वाटतंय...पण तुला काहीही होणार नाहीये"
"मला नाही वाटत मी ह्यातून वाचीन असं, प्रतिभा."
"अभि, असं बोलू नकोस. तुझ्याशिवाय मला शक्य नाहीये काहीही. तू जात असशील तर मीही....."
"आता, तू वाट्टेल तसं बोलू नकोस प्रतिभा. तू असा कसलाही वेडेपणा करायचा नाहियेस. तुला खूप काही करायचय अजून"
"मॅडम" डॉक्टर प्रतिभाला हाक मारत आत आले. "तुम्ही बसा इथे, मी जरा चेक अप करतो"
यश, अस्मि, सुजय सुप्रिया सगळे आय. सी. यू. च्या बाहेर थांबले होते. अभिला झोप लागली आणि नंतर तो तसाच शांतपणे गेला.
अस्मिचं इंजिनियरिंग संपत आलं होतं आणि यशचं चालू झालं होतं. दोघाच्याही परीक्षा दोन महिन्यावर होत्या. प्रतिभा नुसती सुन्न मनानं सगळं करत होती. मुलांना जेवायला देत होती. ऑफिसमधली अभिची आणि स्वतःची कामं बघत होती. मुलांच्या परीक्षांवर परीणाम होवू नये म्हणून बाहेरून शांत असल्यासारखं, सावरल्यासारखं दाखवून आतून मात्र अस्वस्थ होत होती. "तू कसलाही वेडेपणा करायचा नाहियेस" हे अभिचे वाक्य सारखं स्वतःला मनातल्या मनात ऐकवत होती. मुलांच्या परीक्षा झाल्या. अस्मि इंजीनियर झाली. नंतर तिची नोकरीही चालू झाली. यशला थोडे कमी मार्क मिळाले पण तो ही सावरयला शिकला. प्रतिभाने कामात पूर्ण बुडवून घेतले स्वत:ला. बघता बघता यश चे इंजिनियरींगचं शेवटचं वर्ष आलं. अस्मिचेही ऑफिसमधल्या केदारबरोबर लग्न झालं. अस्मि घरातून गेली तेव्हा यश होता घरी. पण पुढच्या वर्षी तो ही अमेरिकेला गेला एम. एस. करायला गेला आणि मग प्रतिभाला परत एकदा एकटं एकटं वाटायला लागलं. काम संपवून घरी आलं की घर खायला उठायला लागलं. तिनी वेगवेगळ्या गावात जावून स्वस्त घर योजनेसाठी मोफत काम करायला सुरूवात केली. दिवस चांगला जायचा. रात्री एकटं एकटं वाटायचं. कधी कधी केदार अस्मि, कधी कधी सुजय सुप्रिया, कधी प्रमिला, प्रतिभाची बहीण, कधी संध्या तिची जवळची मैत्रीण, कधी प्रतिभाची आई, मंगलाताई, यायचे जेवायला, राहयला पण काही दिवसच. परत ती एकटी. हा एकटेपणा तिला खूपच असह्य व्हायला लागला. एकटेपणा सुखानं जगू देत नव्हता आणि "तू असा कसलाही वेडेपणा करायचा नाहियेस" हे अभिचे शब्द मरू देत नव्ह्ते.
एक दिवस हा त्रास अती झाला. तिनी निर्णय घेवून टाकला, पुन्हा जोडीदार शोधण्याचा. आईला जाऊन सांगितला. आईनी पूर्ण पाठिंबा दिला,
"पन्नाशीनंतर एकटीनं दिवस काढायचा मला अनुभव आहे. तूही त्यातून जावंस असं मला मुळीचं वाटत नाही. पण सगळ्या गोष्टी नीट बघूनच मग योग्य तो निर्णय घे."
प्रतिभाला धीर आला. कुठेतरी कोणीतरी असेल की जो बायकोच्या जाण्यानंतर असाच एकटा असेल, त्याला शोधण्यासाठी तिनी प्रयत्न चालू केला. संध्या, प्रमिलाला निर्णय कळवला. संध्याचं मत थोडं निराळं होतं,
"आयुष्यभर आपण बायका घराचं, मुलांचं, संसाराचं बघत असतोच की. तुला पन्नाशीनंतर आलेल्या ह्या एकटेपणाकडे, स्वातंत्र्य म्हणून का नाही बघत तू? एकटी आहेस. जे पाहिजे ते कर. मुलही स्वतंत्र आहेत. कोणतही बंधन नाही. जे हवं ते कर. स्वत:साठी जग. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी करायला वेळ झाला नाही, संसारात अडकल्यामुळे, त्या त्या सगळ्या करून घे."
"स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे गं, पण कोणाची तरी साथ हवी असं वाटतं. आई, तुम्ही सगळ्या मैत्रीणी, यश अस्मि सगळे आहेत, एवढी वर्ष जोडलेली अनेक नाती आहेत. पण प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात गुंतलेला आहे गं. प्रत्येकाचेच व्याप ताप आहेत. आणि ते असणारच. असायलाच हवेत. आपापली आयुष्य बाजूला ठेवून माझा एकटेपणा घालवण्यासाठी कुणीतरी सारखी सोबत करावी अशी अपेक्षा पण नाहीच ना"
"पण म्हणून परत संसाराच्या चक्रात अडकत आहेस? शिवाय कोण कसा माणूस असेल? त्याला समजून घ्या, त्याची मर्जी सांभाळा, त्याला काय हवं नको ते बघा..."
"अगं, तेच तर सहजीवन आहे ना.. आणि योग्य माणूस बघूनच निर्णय घेईन मी, शिवाय तुम्ही सगळे आहातच ना..
"हो गं, आम्ही तर कायमच आहोत तुझ्याबरोबर. मी आपलं माझं मत तुला सांगितलं....."
"वेळ लागेल शोधायला, पण बघू..."
"यश, अस्मिला सांगितलं आहेस का?"
"अस्मिच्या कानावर घालणार आहे. बघते काय म्हणतीय. पण ती समजून घेईल असं वाटतयं. केदार आणि त्याच्या घरचेही फार चांगले आहेत."
"आणि यश?"
"त्याला इतक्यात काही सांगू नये असं म्हणतीय. आत्ता आत्ताच तो अमेरिकेत रूळला आहे. एक सेमिस्टर झाली आहे. त्यात चांगले मार्क्स मिळवले आहेत. कॅम्पस वरचा जॉब, अभ्यास, परीक्षा ह्यात गुंतला आहे. परत ह्यामुळे त्याचं लक्ष्य विचलित नको व्हायला. योग्य वेळ बघून कळवीनच मी."
संध्याशी बोलून प्रतिभाला बरं वाटलं. एकीकडे त्यांच्या फर्मचं काम, सुट्टीच्या दिवशी स्वस्त घर योजनेचं काम आणि योग्य माणासाचा शोध असं सगळं चालू होतं. यशचही एम. एस. पूर्ण व्ह्यायला आलं होतं. त्यानं त्याच्याच विद्यापीठात शिकणाऱ्या एका बंगाली मुलीबरोबर, अशोनिताबरोबर, लग्न जमवून टाकलं होतं. एम. एस. पूर्ण करून दोघं आली आणि लग्न झालं. अमेरिकेला परतण्यापूर्वी प्रतिभानं यश आणि अशोनिता दोघांच्या कानावर घातलं. यश काहीच बोलला नाही फारसं पण प्रतिभाला त्याचं आश्चर्य वाटलं नाही कारण सुरूवातीपासूनच कमी बोलण्याचा त्याचा स्वभाव होता. अशोनितानं मात्र प्रतिभाचा निर्णय आपल्याला योग्यच वाटतोय असं सांगितलं. प्रतिभाला बरं वाटलं. वेळ पडली तर यशला ती समजावूनही सांगेल, असं वाटून गेलं.
हवा तसं माणूस शोधताना प्रतिभाला अनेक चांगले वाईट अनुभव आले. पन्नशीच्या आसपास जोडीदाराच्या जाण्यानं खचून गेलेले अनेक जण भेटले. प्रत्येकाची भेट हा एक वेगळा अनुभव असायचा. प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी. काही काही भेटींमधे प्रतिभाला फारच दडपण यायचं. काही काही जण अगदीच स्पष्टपणे बोलायचे, आपल्या अपेक्षा सांगायचे, काही काही जणं जास्त काहीच बोलायचे नाहीत, की प्रतिभाला कळायचं नाही की नक्की ह्या माणसाच्या मनात काय आहे. कोणाला भेटून आली की ती प्रमिला, संध्याशी बोलायची. अशीच एकदा श्रीहर्ष बरोबर भेट झाली. एका विवहसंस्थेच्या मध्यस्तीनं. श्रीची पहिली पत्नी कॅन्सरने गेली होती. प्रतिभा श्रीच्या गप्पा झाल्या. कसलही दडपण जाणवलं नाही किंवा अवघडल्यासारखंही वाटलं नाही. ह्यांच्याबरोबर जमू शकेल असं प्रतिभाला जरा वाटून गेलं, श्रीलाही तसंच वाटलं बहुतेक. मग पुढचे पाच सहा महिने दोघं भेटत राहिली. श्रीहर्ष एका मोठ्या कंपनीमधे बऱ्याच वरच्या हुद्यावर होते. छान घर, गाडी सगळे काही होतं. त्यांच्या मुलाचंही लग्न झालं होतं आणि उतारवयात कोणाच्यातरी साथीची श्रीलाही तेवढीच गरज वाटत आहे, हे प्रतिभाला जाणवत होतं आणि तेच तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. लग्नाचा निर्णय त्यांनी घेतला.
श्री आणि प्रतिभा दोघांच्या जवळच्या सगळ्यांनी ह्यानिमित्ताने एकत्र भेटायचं ठरवलं. यश, अशोनिताही अमेरिकेवरून आलेले होते. यश नेहमीप्रमाणेच जास्त बोलत नसला तरी आलेल्या सगळ्यांची, विशेषत: श्रीकडच्या पाहुण्यांची काळजी घेत होता. त्यांना काय हवं नको ते अगत्यानं बघत होता. सुजय सुप्रियामात्र उशीरा आले. सगळ्यांची जेवणं संपत आली होती तोवर. आल्या आल्या प्रतिभानं त्याची श्रीहर्षबरोबर ओळख करून दिली. सुजय जरा चिडलेलाच वाटत होता. आजुबाजूला माणसं आहेत ह्याचं भान त्याला नव्हतं की काय कोण जाणे पण एकदम तो म्हणाला,
"बाबा आमचा अतिशय लाडका होता. त्याची जागा जर दुसरं कोणी घेत असेल तर आम्हाला मुळीच आवडणार नाही. आमच्या बाबाच्या जागी आम्ही दुसऱ्या कोणालाही येवू देणार नाही. माझा आणि सुप्रियाचा ह्या नात्याला आजिबात पाठिंबा नाही."
पुढचा (शेवटचा) भाग लवकरच टाकते...