"आजी, गोष्ट सांग ना" सात वर्षांची आर्या प्रतिभाला सांगत होती. आर्या प्रतिभाकडे राहायला आली की रात्री झोपताना आजीनी गोष्ट सांगायची अशी ठरलेली पद्धत होती.
"एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याचं नाव होतं हर्षवर्धन. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती, एक नावडती. ‘आवडती’ प्रजेच्या कल्याणासाठी खूप कामे.....
"आजी, एक विचारू?" गोष्ट तोडत आर्याने विचारले.
"बोल ना"
"तुझ्या गोष्टीतल्या राजाला दोन राण्या, परवा शाळेत आमच्या ताईंनी गोष्ट सांगितली, त्या गोष्टीतल्या राजाला पण दोन राण्या होत्या. पण मला तू एकच अशी राणी माहीत आहेस की जिला दोन राजे आहेत....हो ना? मग सांग ना, तुझा आवडता राजा कोण?"
अचानक आलेल्या प्रश्नाने प्रतिभा थोडीशी गोंधळली. इतर कोणी असं काही बोललेलं तिला आवडलं नसतं पण आर्याने एवढं निरागसपणे विचारलं की प्रतिभाला काय उत्तर द्यावं ते कळलं नाही "आधी ह्या राजाची गोष्ट तर ऐकू पूर्ण, मग माझी, चालेल?"
"हो, चालेल."
राजाची गोष्ट संपता संपता आर्याला झोप लागली. तिला पांघरूण घालून प्रतिभानेही डोळे मिटले. पण झोप काही लागायला तयार नाही. जुन्या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर यायला लागल्या.
आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्षात असताना प्रतिभा आणि अभिजीतची ओळख झाली. एका ‘कोलाज कॉम्पिटिशन’ मधे त्यांनी एकत्र भाग घेतला होता आणि ती स्पर्धा त्यांनी जिंकलीही होती. त्याच वेळी अभि प्रतिभाला म्हणाला होता "आपण एकत्र असलो ना तर ह्यापुढच्या अनेक स्पर्धा जिंकू शकू आपण, भरपूर यश मिळवू शकू!" अभि प्रतिभाला दोन वर्ष सिनियर. त्यामुळे सबमिशन, परीक्षा, कॉलेज मधल्या वेगवेगळ्या स्पर्धा सगळ्यातच अभि प्रतिभाला वेळोवेळी मदत करायचा. मस्त जमून गेलं होतं त्यांचं. मग प्रतिभाचं आर्किटेक्चर पूर्ण झाल्यावर दोघांनी लग्नही केलं. अभिचं ‘पोस्ट ग्रॅजुएशनही’ संपलं होतं तोपर्यंत. दोघांचं सगळंच एकमेकांना अनुरूप होतं; त्यामुळे घरच्यांचा विरोध वगैरे असले काही प्रश्नच आले नाहीत! पुढे अभिने ‘आर्किटेक्ट’ आणि प्रतिभाने ‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून अनेक प्रोजेक्टस एकत्र केले आणि खरोखरीच अभि म्हणाला होता त्याप्रमाणे भरपूर यश मिळत गेलं त्यांना. दोघांनी मिळून स्वतःची फर्म चालू केली. हळूहळू कामाचा व्याप वाढला, संसारातही जबाबदाऱ्या वाढल्या. अस्मि, त्यांची मुलगी, तीन वर्षांची असताना त्यांना दोघांना एका मोट्या प्रोजेक्ट साठी ‘ग्रीस’ला जायची संधी मिळाली. तिकडेही खूप कौतुक झालं अभिच्या कामाचं.
त्याचं काम होतचं तसं. वाखाणण्यासारखं. एकदा काम हातात घेतलं की नुसत झपाटल्यासारखा त्याच्या मागे लागायचा. रात्र रात्र जागून डिझाईन करत बसायचा. स्वतः खपून मॉडेल बनवायचा. खरं तर अशा कामांसाठी त्याला मदत करायला लोकही होते तरीपण एकदा ठरवलं की ठरवलं मग ते पूर्ण करूनच उठणार. मग वेळाकाळाचं भान नाही. तहान भुकेचं भान नाही. प्रतिभा मात्र घरचं सगळं बघून त्याला जमेल तेवढी मदत करायची. अस्मि लहान होती आणि शिवाय ‘यश’चाही नुकताच जन्म झाला होता. अभिची तशी घरात मदत असायची पण कामाकडे सगळं लक्ष जास्त. कधी कधी सगळ्यांनी मिळून बाहेर जाण्याचा, कोणालातरी भेटण्याचा प्लॅन केलेला असायचा. पण ह्याने स्वतःला एखाद्या कामात गुंतवून घेतलेले असलं की अचानक म्हणायचा "तुम्हीच जाऊन येता का? माझं झालं लवकर तर मी येतोच ना मागून..." प्रतिभाला मग वैताग यायचा. कामाची वेळ संपल्यानंतर तरी कधीतरी सगळ्यांनी एकत्र बाहेर जावं, मजा करावी असं वाटणं साहजिक होतं पण ह्याच्या कामाला मुळी वेळ काळाचं बंधनच नसायचं. अभिनं ठराविक वेळी काम करावं नि ठराविक वेळी आपल्या सगळ्यांबरोबर वेळ घालवावा असं तिला वाटायचं, त्यालाही तिनी सांगितलं की पटायचं पण एकदा कामात गुंतला की सगळं विसरून जायचं. जेवणाची वेळ उलटून गेली की तिलाच काळजी वाटायला लागायची मग तीच ताट हातात आणून द्यायची. चिडचिड व्हायची पण अभिच्या कामाचं महत्त्वही कळायचं तिला. त्याचं काम हेच त्याचं पॅशन होतं, सतत नवीन नवीन डिझाईन्स करत राहयचा, एकाच वेळी चार पाच प्रोजेक्ट्स वर काम करायचा. त्याच्या कामाचं कौतुक झालं की तिलाही अभिमान वाटायचा, आदर वाटायचा. शिवाय तिच्या कामाचाही सहभागही असायचाच, त्यामुळे तिचंही कौतुक व्हायचं. त्याच्या यशात आपला वाटा आहे हे जाणवून चांगलं वाटायचं. कुठलं मोठ्ठ प्रोजेक्ट यशस्वीपणे संपून त्याचं प्रचंड कौतुक झालं की तो तर म्हणायचाच, "बघ, मी म्हटलं नव्हतं तुला? आपण एकत्र असलो ना तर भरपूर यश मिळवू शकू म्हणून?" पण अती कामामुळे अभिचा सहवास नीट मिळत नाही अशीही रुखरुख लागून राहायची तिला. एखाद्या वेळी ती खूपच रागावली तर हा अचानक सरप्राइज द्यायचा. सगळ्यांना बाहेर घेऊन जायचा. मुलांबरोबर मस्ती करायचा. आलतू फालतू विनोद करून सगळ्यांना हसवत बसायचा. त्याचा हाच सहवास तिला हवासा असायचा. त्याच्याबरोबर असा काही वेळ निवांतपणे घालवला की तिला एकदम बरं वाटायचं. एवढ्या दिवसांचा मनातला वैताग पार निघून जायचा! की परत अभि कामात बुडून जायला मोकळा !
यश तीन वर्षाचा असताना पुन्हा ग्रीसला जायची संधी मिळाली. एका मोठ्या कामासाठी तिथल्या प्रसिद्ध कंपनीकडून खास निमंत्रण मिळालं होतं. शिवाय जगभरातल्या आर्किटेक्टसची मोठी कॉन्फरन्सही होती. त्यात अभिच्या पेपरचं विशेष कौतुक झालं. परतण्यापूर्वी एका सुट्टीच्या दिवशी दुपरी सगळ्यांनी शॉपिंगला जायचं ठरवलं. सकाळभर अभिचं काहीतरी काम चालूच होतं, तरी पण दुपारी ठरल्याप्रमाणे सगळे एक्त्र बाहेर पडले म्हणून प्रतिभाही खुशीत होती. वाटेत एका बिल्डींगचे काम चालू होते, अभि म्हणालाच, "तुम्ही व्हा पुढे, खरेदी चालू करा, मी येतोच ही बिल्डींग जरा नीट बघून. शिवाय त्याचा आर्किटेक्ट पण भेटतोय का साईट वर बघतो" प्रतिभा यश आणि अस्मिला घेऊन निघाली. दुकानात पोचल्यावर अस्मिने इकडे तिकडे पळायला सुरवात केली. एवढं मोठ दुकान तिनी कधीच पाहिल नव्ह्तं. यशला बाबागाडीत ठेवलं होतं, दुकानातली गर्दी बघून तो ही घाबराघुबरा झाला आणि त्याने रडायला सुरवात केली, प्रतिभाला त्याला बाबा गाडीतून कडेवर घेण्याशिवाय पर्याय नव्ह्ता. अस्मिचे इकडे तिकडे धावणे, वाट्टेल ती खेळणी, कपडे उचलून बघणे चालूच होते आणि इकडे ह्याचे रडणे. त्याला कडेवर घेऊन प्रतिभा अस्मिच्या मागे मागे धावत होती. मनातल्या मनात अभिवर राग काढत होती,"दर वेळेचं आहे ह्याचं. आता आला असता माझ्याबरोबर तर काही बिघडलं असत का? पण नाही." "अग, अस्मि थांब. पळू नको. पुढे बघून चाल नाहीतर पडशील" असं प्रतिभा ओरडली आणि पळता पळता स्वतःच्याच चपलेत पाय अडकून धापकन पडली. यशला धरले तिनी, त्यामुळे त्याला लागले नाही फारसे, पण एकदम धक्का बसल्यने त्याने मोठ्याने भोकाड पसरला. प्रतिभाला मात्र जरा लागले. शिवाय मुलीमागे ओरडत ओरडत पळता पळता चारचौघात स्वत:च्याच पायात पाय अडकून पडल्याने तिलाही कसेतरीच वाटायला लागले. अस्मि धावत आली आईजवळ. पण तीही जरा घाबरली. आजूबाजूला खरेदी करणाऱ्या बायका जमल्या. त्यात योगायोगाने मिसेस शिनोवा होत्या, मागच्या ग्रीसच्या ट्रीपच्या वेळी त्यांच्या घराचे काम अभि आणि प्रतिभाने केले होते. त्यांनी प्रतिभाला लगेच ओळखले, त्यांच्या नवऱ्याने जाऊन पाणी आणले, शिवाय तो डॉक्टर. त्याने लगेच दुकानातून प्रथमोचाराचे साहित्य विकत घेउन तिथेच मलमपट्टी करून दिली. आणि मिसेस शिनोवांनी यशलाही शांत केले. तेवढ्यात अभि पोचलाच. सगळं ऐकल्यावर त्याला हसूच यायला लागलं, खर तर प्रतिभालाही ती ज्या पद्ध्तीनं पडली ते आठवून आता हसू येत होतं पण अभिवरचा राग काही गेला नव्हता. "बघ, तू आला असतास माझ्याबरोबर तर हे सगळं टळलं असतं!" "अग, पण मी नसलो तरीही तुझी आणि मुलांची काळजी घ्यायला आलं ना दुसरं कोणीतरी! मीच पाठवलं होतं शिनोवांना आज शॉपिंगला..." अशा वेळी थट्टा करायला त्याला अगदी ऊत येत असे. सगळं ट्रान्स्लेट करून त्यानं डॉक्टरांना सागितलं. त्यांनीही त्याला "हो हो" म्हणून टाळी दिली. शिवाय सगळ्यांना घरी जेवायला घेऊन गेले. सगळ्या मित्रमंडळींना जमवून अभि प्रतिभाची खास ओळख करून दिली. त्यांचे घर एवढे आवडले होते सगळ्यांना की त्यांच्या घराचे ‘आर्किटेक्ट’ आणि ‘इंटिरियर डिझायनर’ आले आहेत म्हटल्यावर सगळे अगदी उत्सुक होते भेटायला. शिनोवांच्या मित्रानी तर लगेच त्यांच्या नव्या ऑफिसच्या बिल्डींगचे काम अभि प्रतिभाला देण्याचा निर्णय सांगून टाकला आणि अभि प्रतिभाचं ग्रीसमधलं आणखी एक प्रोजेक्ट नक्की झालं.
मुलं मोठी होवून स्वतंत्र व्हायला लागली तसा प्रतिभानेही कामाचा वेळ वाढवला. प्रतिभा ऑफिसमधे असली की अभिला पण चांगलं वाटायचं. दोघांचं कामाचं ट्युनिंग तर फारच छान होतं. दोघांनी एकत्र काम केलं की ते प्रोजेक्ट यशस्वी झालचं! वर्ष भराभरा पळत होती, अभि प्रतिभा आणि त्यांच्या फर्मचं नाव होत होतं. पैसा, प्रसिद्धी, सन्मान सगळं मिळत होतं. ह्या सगळ्याची मजा घ्यायला, काही निवांत क्षण एकमेकांच्या सहवासात घालवायला पुरेसा वेळ तेवढा मिळत नव्ह्ता! प्रतिभा म्हणायची,"प्रोजेक्ट यशस्वीपणे संपलं की यश साजरं करायला पाहिजे, थोडा आरामही करायला पाहिजे" अभि प्रोजेक्ट संपलं की मुलांच्या आवडीचा केक आणून सेलेब्रेट करायचा पण आराम करण्याचा भाग काही त्याला जमायचा नाही. सुट्टीच्या दिवशीही स्वस्त घर योजनेमधल्या घरांचे प्लॅन आणि डिझाइन करायला जायचा. ते सुद्धा एक पैसाही फी न आकारता. प्रतिभाचीही ह्या सगळ्याला संमती होतीच फक्त अधूनमधून थोडी विश्रांती घ्यावी एवढाच तिचा हट्ट असायचा. तीही घरातलं, मुलांच्या परीक्षा वगैरे सगळं बघून जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा अभि बरोबर स्वस्त घर योजनेसाठी कामाला जायची. तिथेच त्यांची सुजयबरोबर ओळख झाली.
पुढचा भाग लवकरच टाकते....