सुखाचा हिंदोळा

एकदा एका माणसाला ;

सहजच अगदी मी भेटलो होतो;

वणवणनाऱ्या माझ्या वाटेवर;

त्याच्या शरदाच्या हसण्याने सुखावलो होतो.

आयुष्यात दुःखाने पिचणाऱ्या माणसांच्या;

डोळ्यात तो स्वप्ने जागवत होता;

सुकलेल्या फुलांच निर्माल्य सुद्धा;

तो अलगद पाण्यात सोडीत होता.

त्याच्या सुंदर जगण्याचा तेव्हा;

क्षणभर मला हेवाच वाटला होता;

तो गातो ते सुंदर गाणं गाण्यासाठी;

मी सुद्धा माझ्या तारा जुळवल्या होत्या.

अचानक वाटलं मला का कोण जाणे;

डोकावावं याच्या सुंदर घरात;

पण माझा भ्रमनिरासच झाला;

तो तर जगत होता यातनामय नरकात.

जीच्याबरोबर आयुष्याची सुंदर स्वप्ने;

पाहिली होती त्याने पूर्णं करण्यासाठी;

तिच गेली अर्ध्या रस्त्यावर;

टाकून त्याच्या पदरी एक अपंग भेट.

आपल्या लाडक्या बायकोची आठवण म्हणून;

ति शोकांतिका तो जपत होता;

दुःखाला विसरून स्वतःच्या;

त्याचा स्वतःचा अंश तो जपत होता.

मला माझीच लाज वाटली;

अश्रूंना डोळ्यांवाटे वाट फुटली;

तरीही तो शांतच होता;

डोळे माझेच पुसत होता.

मला म्हणाला आयुष्यात जेव्हा;

दाटून येतात खूप दुःख;

तेव्हा त्यांच्याशीच तू मैत्री कर;

आणि वेदनांच्या गावात वस्ती कर.

मग जाणवेल तुला नकळत;

तुझ्या अश्रूंचेही मोती झालेत;

अन् तुझी स्वप्नील पाखरेसुद्धा;

आकाश घेऊ शकतील कवेत.

पहाडासारखं शल्यसुद्धा;

तुला राईएवढं वाटू लागेल;

दुःखच तुला कधीतरी;

"माझा लाडका" म्हणून कुरवाळू लागेल.

त्याच अस बोलणं ऐकताना;

माझा नवाच जन्म झाला होता;

आतापर्यंत भोगलेल्या प्रसववेदनांनंतर;

पुढे तर फक्त सुखाचाच हिंदोळा होता.