कधीतरी मला वाटतं;
की कोसळेल चिंब पाऊस;
उडणारी धूळ बसेल जमिनीवर शांतपणे;
अन् मोकळ्या झालेल्या आकाशात;
मी नव्याने झेपावण्याचा प्रयत्न करेन.
कधीतरी मला वाटतं;
विसरून जाईनं मी पराभवांचे सल;
जीवघेण्या आठवणी;
अन् नव्या आशेचा जन्म होईल;
उन्मळून पडलेल्या वठल्या खोडावर;
नव्या पालवीला जन्म देण्यासाठी.
कधीतरी मला वाटतं;
जगण्याच्या वाटेवर सापडेल काहीतरी;
जे असेल फक्त माझंच;
कुणीतरी भेटेलही घेऊन ;
प्रकाशाच आंदण फक्त माझ्याचसाठी.
मग मी पडेन मागे;
त्याने दाखवलेल्या रस्त्यावर डोळे मिटून;
................पुढे विश्वासाने चालण्यासाठी.