कानपुराण

कर्णेंद्रिय असे पंचेंद्रियात,अतिमहत्वाचे एक

ऐकता येतात, दुसऱ्याचे विचार, ते  प्रत्येक
कुजबुजतात युगल, एकमेकांच्या कानात
पाहून त्याना लोक , कानाडोळा करतात
होतसे ही गोष्ट, कर्णोपकर्णी सर्व जगतात
कानपिचक्या मिळती, मग दोघांना घरात
अपमतलबी कान भरती, मुलीच्या बापाचे
बाप मुलीचा,  कानी कपाळी ओरडे मुलीचे
घाली शेजारीण गोष्टी,कानावर भ्रताराच्या
कान टवकारे नवरा, ऐकून गोष्टी पत्नीच्या
कानोकानी गोष्टी जाती, कानावर तरुणाच्या
बोलावे मुलीला, करे कानगोष्टी महत्त्वाच्या
कानाची पाळी लाल होई पाहताच तरुणीस
देई काप, घालण्यास कानात तिला बक्षिस
करे मुलगी कानाडोळा, बापाच्या बोलण्याकडे
भेटण्यास जाते पियास, रोज घालुनी साकडे
हलक्या कानाचा बाप, देई कानफडात मुलीच्या
रडत माफी मागे, कान ओढून समोर त्याच्या
होते शेजारणीच्या घराच्या, भिंतीस ते कान
सांगते ओरडून भ्रतारास,घडलेले ते वर्तमान
एक दिवस विपरित येई, कानावर बापाच्या
गेली असते, मुलगी पळून संगे हो पियाच्या
कनकोंडा झाला असे बाप,  होई मूकबधीर
सज्ञान मुलगी झाली असती लग्नास अधीर
जाती सांत्वन करण्यास , शेजारी त्या बापाचे
ओरडतो पिसाळलेला बाप, दडे बसती कानाचे