हा आणि तो

आक्रंदलेल्या डोळ्यातून
भकासपणे गोठलेल्या आभाळाकडे पाहत
मृतवत झालेल्या जमिनीवरील
पिचलेल्या डेखळांवर
कधीच्याच साठलेल्या अश्रूंना सांडत
दुर्दैवाची फतकल मारून बसलेला
एक शेतकरी...
आणि
लाडावलेल्या हातांवर
आपल्या गालाला वारंवार घासत
नको असतानाही
भोगावलेल्या स्पर्शवासनेचा
आस्वाद पुन्हा घेण्यासाठी
अलगदपणे ओठांना लागलेल्या
आस्वादक सवयींना शमविण्यासाठी
मऊशार गादीवर
कधीच्याच लोळलेल्या वासनेला कुरवाळत
सुखासीनतेची झालर ओढलेला
एक शहरी...