हिमालय ही चीजच तशी आहे...!!

उत्तर भारतातली कुठलीही सहल करायची म्हटली की आपल्याला आधी आठवते ती तिथली थंडी आणि पाठोपाठ आठवतो तो बर्फ. ‘नॉर्थ’ची सहल केली पण बर्फ बघितला नाही असं जर कुणी आपल्याला सांगितलं तर गोव्याला जाऊन समुद्र न बघता परतलेल्या माणसासारखं आपण त्या व्यक्तीला लगेच मूर्खात काढू. उत्तर भारताचं पर्यटन आणि बर्फाच्छादित शिखरं यांचं असं इतकं घट्ट नातंच आपल्या मनात आपण बाळगलेलं आहे.
त्यामुळे एखादा वारकरी विठ्ठलदर्शनासाठी जितका आसुसलेला असतो तितकीच, किंबहुना त्याहून कणभर जास्तच मी आसुसलेले होते त्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन घेण्यासाठी आणि ‘देवभूमी उत्तरांचल’मध्ये प्रवेश करून दोन दिवस उलटून गेले तरी त्या दर्शनाचा लाभ काही होत नव्हता.

काय गम्मत आहे! तिकडे देशाच्या दुसऱ्या टोकाला केरळ पर्यटनाच्या जाहीरातीतही आपण ‘गॉडस ओन कंट्री’ असं लिहीलेलं वाचतो आणि नवी दिल्लीहून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८७चं बोट पकडून नैनितालला जाताना उधमसिंगनगरच्या जरासं अलिकडेही ‘देवभूमी उत्तरांचलमें आपका स्वागत है।’ अशा पाटीनंच आमचं स्वागत केलं. (उधमसिंग या शब्दामुळे असेल कदाचित पण इतकी वर्षं उधमसिंगनगर हे गाव/शहर पंजाबमध्ये आहे असंच मला वाटायचं. मुंबई आणि पुण्यापलिकडेही एक मोठं जग अस्तित्वात आहे याचा विसर पडल्यावर दुसरं काय होणार! )
खरं म्हणजे निसर्गानं आपल्या देशाला इतकं भरभरून दिलंय की त्यातल्या अमूक एखाद्या भागालाच काहीतरी विशिष्ट नाव देऊन वेगळं काढणं शक्यच नाही. एखादा देवभोळा मनुष्य जसा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या घटनांना देवाची करणी-देवाची कृपा अशी नावं देतो तसंच कोकणातला किंवा कन्याकुमारीचा अथांग पसरलेला समुद्र ही त्या निसर्गदेवतेची आपल्या देशावरची करणी आहे आणि हिमालय ही कृपा आहे!
... आणि तो कृपाप्रसाद मिळवायच्या कल्पनेनं मला पुरतं झपाटून टाकलं होतं.

उत्तरप्रदेश आणि उत्तरांचल यांच्या सीमेवर एका चेकपोस्टपाशी ‘देवभूमी उत्तरांचलमें’ जेव्हा आमचं स्वागत झालं तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजत होते. सूर्यास्त होऊन गेला होता. बोचऱ्या थंडीनं चुणूक दाखवायला सुरूवात केली होती. इतक्या लवकर बुडलेला दिवस, बाहेरचा गुडूप अंधार आणि मुख्य म्हणजे ती थंडी यामुळे गाडीच्या खिडकीतून लांबवर नजर टाकून तिथे कुठेतरी बर्फाच्छादित शिखरं असणार आणि दिवसा ती नक्की दिसत असणार अशी मी मनाशी पक्की खूणगाठ बांधून टाकली होती.
पण नैनितालमध्ये दोन दिवस फिरल्यावर, अगदी केबलकारमधून तिथल्या ‘स्नो व्ह्यू पॉईंट’वर जाऊन आल्यावरही बर्फ-आघाडीवर तशी सामसूमच होती. त्यामुळे ती खूणगाठ आता सैल करावी की काय असा विचार मनात घोळायला लागला होता...

----------------

आमच्या नैनीतालमधल्या भटकंतीचा तो शेवटचा दिवस होता आणि नैनिताल गावापासून चाळीसएक कि. मी. अंतरावरच्या मुक्तेश्वरला जायचं की नाही यावर आमचं एकमत होत नव्हतं. एक छोटंसं देऊळ बघायला इतक्या लांब कशाला जायचं असं (माझ्याविरुद्ध युनियन स्थापन केलेल्या) माझ्या नवऱ्याचं आणि मुलाचं मत होतं. पण का कोण जाणे, इतरवेळी देवळाबिवळांच्या कधीच फारशा फंदात न पडणाऱ्या मला मात्र मुक्तेश्वरला जावंसं वाटत होतं. अल्पमतात असूनही माझ्या बाजूनं ठराव मंजूर करून घेण्यात मी यशस्वी झाले आणि मुक्तेश्वरला जाण्यासाठी सकाळी साडेनऊला आम्ही हॉटेल सोडलं.
देवदारच्या झाडांनी मढलेले उंचचउंच डोंगर, दुसरीकडे खोल दऱ्या, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि सकाळच्या दहानंतरही वाजतच राहणारी थंडी यांच्या सोबतीनं एक्सप्रेस-वेच्या एकचतुर्थांश(! ) रुंदी असलेल्या रस्त्यावरून आमचा प्रवास तसा मजेत सुरू होता. गाडीत लता ‘चल संन्यासी मंदीर में... ’ गात होती.
आणि एका वळणावर अचानक, अगदी अनपेक्षितपणे, इंग्रजीत ज्याला आपण ‘आऊट ऑफ नो-व्हेअर’ म्हणतो अशी हिमालयातली एक बर्फाच्छादित डोंगररांग समोर दिसली!!

DSC00615.JPG

गाण्याबरोबर गुणगुणताना ‘चल संन्यासीऽऽऽऽ’ची तान मारण्यासाठी उघडलेलं माझं तोंड तसंच उघडं राहीलं. संन्यासी मंदीराचा रस्ता विसरला. मी आमच्या चालकाला ताबडतोब गाडी कडेला थांबवायला सांगितली.
बर्फाच्छादित डोंगरांचं पहिलं दर्शन! तो शुभ्र चमत्कार डोळ्यांत साठवताना भान हरपलं.
आधीचे दोन दिवस नैनितालमध्ये फिरताना अनेक उघडे बोडके डोंगर दिसले होते. तिथे अजिबात झाडी नसण्याचं कारण विचारलं असता आमच्या चालकानं सांगितलं होतं की हिवाळ्यात तिथे बर्फ पडतं. त्यामुळे इतर ऋतूंमध्ये ते डोंगर ओसाड दिसतात. ते ऐकून इतकी चुटपूट लागली होती की काय सांगू!
आपण अजून महिन्याभरानंतर आलो असतो तर, दिवाळीत रजा न घेता नंतर घेतली असती तर, नैनितालला ऑक्टोबरमध्येच येण्याची घाई केली नसती तर...
मुक्तेश्वरला न जाण्याचं मी ऐकलं असतं तर...?
हे सगळे जर-तर त्या एकाच दृश्यानं पार पुसून टाकले.
नंतर मुक्तेश्वरपर्यंतचा उरलेला प्रवास निदान माझ्यासाठी तरी केवळ उपचारापुरताच राहीला. तिथल्या देवळात जाण्यासाठी एक छोटीशी टेकडी चढावी लागते. आश्चर्य म्हणजे समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर्सपेक्षाही जास्त उंची असलेल्या त्या देवळाच्या परिसरातून बर्फाचं ‘ब’देखील दृष्टीस पडलं नाही. रस्त्यातलं आधीचं ते एकच वळण मात्र असं जगावेगळं कसं निघालं ते त्या हिमालयालाच ठाऊक!
तसं बघायला गेलं तर शाळेत असताना मी आईबाबांबरोबर काश्मीरची सहल करून आले होते. धाकट्या बहिणीबरोबर गुलमर्गच्या बर्फात मनसोक्त खेळलेही होते. त्यामुळे हिमालयाचं, बर्फाचं तसं आकर्षण असायचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं. पण हिमालय ही चीजच तशी आहे...!!

----------------

नैनितालमधली कुडकुडवणारी थंडी, तिथल्या डोंगरदऱ्या, देवदारचे वृक्ष आणि मुक्तेश्वरला जातानाचं ते हिमालयदर्शन यांनी मोहरून जायला झालं होतं. पण उत्तरांचलमधल्या चार प्रमुख ठिकाणी मुक्काम केल्यावर दहा दिवसांच्या सहलीच्या शेवटी याच नैनितालला सर्वात शेवटचा चौथा क्रमांक मिळणार होता. एखादा जागतिक कीर्तीचा खेळाडू एखाद्या लिंबूटिंबू खेळाडूविरुद्ध हरला की इंग्रजीत त्याचं ‘अ बिग अपसेट’ असं वर्णन केलं जातं. लौकिकार्थानं एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून मान्यता पावलेल्या नैनितालला चौथ्या क्रमांकावर ढकलण्याच्या या अपसेटचा करविता धनी होता हिमालयच... कौसानीचा!

कौसानीतला आमचा मुक्काम एक दिवस, एक रात्र इतकाच होता. त्यामुळे ते ठिकाण आमच्या फारसं खिजगणतीतही नव्हतं. मुळात कसौनी की कौसानी इथपासून आमची सुरूवात होती. त्यावर आमच्या चालकानं (‘कोई मिल गया’मधलं) कसौनी हिमाचलमधलं आणि कौसानी उत्तरांचलमधलं अशी आमच्या माहितीत भर टाकली. चार-साडेचारच्या सुमाराला तिथल्या हॉटेलवर पोहोचताना ‘आपण जे नाव ऐकून आहोत ते हे नाहीच. मग बरंय, इथे एकच दिवसाचा मुक्काम आहे ते... ’ असं आम्ही स्वतःचं समाधान करून घेतलं आणि जवळच असलेला गांधीजींचा ‘अनासक्ती आश्रम’ बघायला बाहेर पडलो.
आश्रमात काय असणारे बघण्यासारखं, एक चक्कर मारून परत येऊ असं ठरवून आम्ही गेलो ते तब्बल दीड दोन तासांनी, अंधार पडल्यावर नाईलाजास्तव परतलो. आम्हाला तिथे खिळवून ठेवणारा होता तोच - हिमालय!
एका उंचवट्यावर वसलेला छोटासा आश्रम, समोर हिरव्यागार डोंगररांगा आणि त्यांच्यापलिकडे मावळतीची सोनेरी उन्हं अंगावर घेत ढगांआडून डोकावणारी बर्फाच्छादित शिखरं! बस्स... नजरेसमोर फक्त हेच!
१९२९ साली देशव्यापी दौऱ्यावर निघालेल्या आणि दोन दिवस श्रमपरिहारासाठी म्हणून कौसानीत थांबलेल्या गांधीजींना या उन्हात न्हाणाऱ्या सोनेरी शिखरांनीच तब्बल चौदा दिवस तिथे थांबवून ठेवलं होतं. आपल्या ‘अनासक्ती योग’ या पुस्तकाची प्रस्तावना त्यांनी त्या वास्तव्यात लिहून पूर्ण केली.
आश्रमाच्या एका कोपऱ्यात एका चौथऱ्यावर समोर दिसणाऱ्या हिमालयाच्या दहा शिखरांची क्रमवार नावं, प्रत्येकाची उंची, आश्रमापासूनचं अंतर इ. माहिती लिहून ठेवलेली होती. पण त्या माहितीच्या आधारे कुठलं नंदादेवी शिखर आणि कुठलं नंदाघुंटी ते पडताळून पाहण्यात मला तितकासा रस नव्हता; त्रिशूल-१ सर्वात उंच आहे की माईकटोली याची चर्चा करण्यात फारसं स्वारस्य नव्हतं. बर्फावरच्या उजेडाचा कणंकण अंधारामुळे बाजूला सारला जात असतानाचं त्या शिखरांचं मिनिटागणिक बदलणारं रूप मला न्याहाळायचं होतं. मावळतीचा प्रत्येक क्षण कारणी लावायचा होता...

----------------

कौसानीत लोकं येतात ते तिथला, किंबहुना हिमालयातला, सूर्योदय बघायला आणि तो सूर्योदय आमच्या हॉटेलच्या खोलीतूनही दिसेल असं जेव्हा हॉटेलच्या मॅनेजरनं आम्हाला सांगितलं तेव्हा खास सूर्योदय बघण्यासाठी म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे आश्रमात जाण्याचा माझा बेत मी रद्द केला.
दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला गजर वाजला तेव्हा उबदार दुलईतून कडाक्याच्या थंडीत बाहेर गॅलरीत जायचं एक क्षणभर जीवावर आलं होतं. त्यादिवशी मी जर तशीच झोपून राहीले असते तर बाहेरच्या एका नितांतसुंदर प्रकाशोत्सवाला आयुष्यभरासाठी मुकले असते.

बाहेर झुंजूमुंजू झालं होतं. आदल्या संध्याकाळची परतफेड करण्यासाठी, अंधाराचा कणंकण बाजूला सारण्यासाठी सूर्यप्रकाश कुठल्याही क्षणी रंगमंचावर प्रवेश करणार होता...
आणि ठीक सव्वासहा वाजता एकेक करून त्रिशूलच्या तीनही शिखरांवर त्यानं पाऊल ठेवलं.

DSC00720.JPG

नजरेसमोर जे दिसत होतं ते शब्दातीत होतं. ‘ढगाळ हवा असेल तर...? ’ या आमच्या मनातल्या शंकेला दूर सारत नरकचतुर्दशीच्या पहाटे हिमालयानं आम्हाला एक आगळीवेगळी भेट दिली होती.
पैसाअडका, बंगले, गाड्या, कपडेलत्ते, दागदागिने, मल्टीप्लेक्सेस, मॉल्स, मोठ्या शहरांचा चकचकाट या सगळ्यांसकटच्या माणसाला कःपदार्थ वाटायला लावणारं ते दृश्य... आसक्ती आणि अनासक्ती यांच्यातला फरक स्पष्ट करणारं...
ते फक्त नजरेत सामावून घेण्याचं काम आपण करायचं. हिमालयाच्या तटस्थपणाची विविध रूपं न्याहाळायची. त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं...
कारण, हिमालय ही चीजच तशी आहे...!!

----------------

नैनिताल सोडताना हिमालयदर्शनानं मोहरून गेलेलो आम्ही कौसानीतल्या त्याच्या रुपानं भरून पावलो होतो. कौसानीतल्या दृश्यांचा अंमल पुढे मसूरीतही कायम होता. त्यामुळे मसूरीत दोन दिवस तो दिसला नाही त्याचं आम्हाला फारसं काही वाटलंच नाही.
तरीही आम्ही मसूरीतून निघालो त्यादिवशी सकाळी आम्हाला निरोप द्यायला मात्र तो आलाच... तसाच एका वळणावर... मुक्तेश्वरसारखाच अनपेक्षितपणे... आश्चर्याचा नव्यानं धक्का देत...

पुढे कॉर्बेट पार्कमधला वाघ आम्हाला हुलकावणी देऊन जाणार होता. पण हिमालयानं तसं केलं नाही. काही ठराविक लोकांनाच नाही तर समस्तजनांना तो आपल्या दर्शनानं उल्हसित करतो; उल्हसित झालेल्यांना अधिक आनंद देतो; आनंदाचे डोही नाचणाऱ्यांना ते हिंदीत म्हणतात तसं ‘सांतवे आसमान पर’ नेऊन ठेवतो... आणि तिथे पुन्हा फक्त तोच असतो!
वेळीच खबरदारी घेतली नाही तर हा आनंद, हा उल्हास एक दिवस वाघाप्रमाणेच आपल्याला हुलकावणी देईल, चुटपूट लावून जाईल. कॉर्बेटच्या वाघावर, गीरच्या सिंहावर जी वेळ आपण आणली आहे तशीच हिमालयावर आली तर ती आपल्याच विनाशाची सुरूवात असेल...
यापुढे जेव्हा ‘नॉर्थ’च्या सहलीला जाल आणि हिमालय तुम्हाला दर्शन देईल तेव्हा पहिल्या दहापंधरा मिनिटांचा, फोटो वगैरे काढण्याचा उत्साह संपल्यावर मन आणि डोकं रिकामं करून एकटक त्याच्याकडे थोडावेळ बघा. तो हे सगळं तुमच्याशी बोलेल. कारण...

हिमालय ही चीजच तशी आहे...!!!