कात्री

==============================

.
.
नाळेचे टोक नेहमी तुटण्यासाठीच असते.
पूर्णत्व देता देता सुटण्यासाठीच असते.
पहिली कात्री लागून पहिल्यांदा बाळ समोर दिसते;
तुटल्या नाळेला विसरून आई तेव्हा पासून हसते.
सोडून मांडी छोटे पाऊल मग घरभर दुडदुडू लागते..
टाळ्या वाजवत आई त्याच्या तालावर नाचते..!
सुटते मग बोट असेच पुस्तक हाती येते..
पुन्हा नव्याने लेकरा संगे आई परीक्षेस बसते.
नव्या वाटा नवे उंबरे आकाश पाखरा खुणावते,
एका एका उल्लंघनासंगे ते पहिले स्मित स्मरते..!
.
नाळेचे टोक नेहमी तुटण्यासाठीच असते.
पूर्णत्व देता देता सुटण्यासाठीच असते.
.
.
==============================
स्वाती फडणीस................................ १३-११-२००९