******************************
******************************
जगलो तुला घेऊन राजरोस आयुष्या
तुला का आता अंधाराचा सोस आयुष्या
बहरातले जीणे शिशिरातली गाणी झाली
टाकलेस दान किती भरघोस आयुष्या
सवेच फिरलो जिंगलो खेळलो नाचलो
घातला मनस्वीच ऐसा हैदोस आयुष्या
खेळलो सगळेच डांव अन निर्ढावलोही
तिथे असायचास आता नसतोस आयुष्या
आता मोजकाच उरलो ओळखून आहे
श्वासांचे इमले झाले रे ओस आयुष्या
अतृप्तीची कहाणी नव्याने लिहून पाहू
वार्धक्याचा नकोरे अफसोस आयुष्या
अमर्याद तुझा संग हवा आंस नाही
पण अंक शेवटाचा हवा ठोस आयुष्या
*******************************
*******************************