मारला फेरफटका मी, एका उपवनात
होते विविध रंग, सुमनांच्या स्वरुपात
सुंदर सुमने होती,ती वाऱ्यावर डोलत
आगळाच आनंद मिळे,मजला मनांत
होती विविध सुमने, एकाच वाफ्यात
भांडण नसे त्यांच्यात, रहाती सुखात
वैषम्य वाटे पाहून, ह्या मानव जातीत
भेदभाव करती, पहा आपुल्या रंगात
रुंजी घालत होते, पाहा अनेक मिलिंद
प्रत्येक फुलातून करती, गोळा मकरंद
भेद करत नव्हते, ते कोणत्या फुलात
कधी येईल ही जाण,या मानव जातीत
वृक्ष वेली वाढती, घेऊनी संगती गवत
घेत असे विविध, आकार एकाच भूमीत
फरक करत नसे, भूमी त्यां पालनात
भेदाभेद दिसतो हा,फक्त मानव जातीत
एकता राहिली जर, मानव धर्म जातीत
दिसतील ते सुंदर, सुमनासारखे रंगीत
विविध आकार रंग, असून ही एकत्रित
राहतील आनंदात, विसरून भेद मजेत