नसेल किंवा असेलही

मी तुझे हात हातात घेतले तेव्हा;

वारा कोठेतरी कोंडलेलाच होता;

पाऊस यावा अस वाटतानाच;

अचानक अंधार दाटून आला होता.

तेव्हाचा तो क्षण मला अजून आठवतो;

तुला आठवतो?

नसेल किंवा असेलही;

माझ्याप्रमाणे तूसुद्धा तो क्षण;

कदाचित तुझ्या मनाच्या शिंपल्यात जपला असशील.

कितीतरी उन्हाळे पावसाळे;

निघून गेले आपल्या नात्यावरून;

क्षितिज हाताशी यावे म्हणून जशी तगमग व्हावी;

तसे आपल्या एकत्र येण्यासाठी तळमळत होते माझे मन;

तुला समजले?

नसेल किंवा असेलही

कदाचित तूसुद्धा त्याचीच वाट बघत होतास.

अगदी मनस्विपणे तुझी व्हावे;

अस कधी वाटलं नव्हत खरं म्हणजे;

पण स्वतःला इतकं सावरावं;

हेही कधी वाटलं नव्हत

तुला समजले?

नसेल किंवा असेलही;

कदाचित तूसुद्धा स्वतःला सावरलंच होतंसं.

आतासुद्धा मी तुझे हात हातात घेते;

ज्यामध्ये उतरता उतरत नाही ओढ त्यावेळची;

एवढा वादळी वारा कधीच वाहिला नाही;

अन आपण नव्याने पुन्हा कधी भेटलोच नाही.