******************************
मंद वाऱ्यात, धूंद ताऱ्यात, लाजत रात्र आली
चांदण्यांचे तबक हाती, उधळीत रात्र आली!
मंदावला भास्कर.., चांदणे सावळे निळावले
स्पर्षाने शशिकराच्या, बघ गरती रात्र झाली!
शृंगारात विरघळे, अस्तमानाचे गीत फिके
लाजलेली रातराणी..., फुलवीत रात्र आली!
लज्जेने धरले हळुवार, दाती शेव अंधाराचे
गुंफीत गीत मिलनाचे.., आतूर रात्र झाली!
नको रे सख्या हे असे, अता दुरावे अंतरीचे
रुणझुणते सुर समीराचे, धुंदीत रात्र आली!
चल मिळून तनुत, आगळा देहराग आळवू
मिटले अंतर सगळे..., अन गंधीत रात्र झाली!
विशाल.
*******************************