कविता माझी..
शतावधानी, मलाच देते पुन्हा पुन्हा
नित नव्या जाणिवा,
भोगते किती स्वतः बिचारी, माझ्यासाठी
खेळ हा नवा
कविता माझी...
क्वचित होते, शरीराचा एखादा अवयव
ठसठसणारा,
परी वाहतो सुख पांघरता उरी अनामिक
झुळझुळ वारा
कविता माझी...
कधीच नसते बग्गीमधली तोरा
दाखवणारी राणी,
मातीच्या हातांनी तिचिया गढूळ
अळवावरले पाणी
कविता माझी,
नव्हती, नाही गुलाम खोट्या शब्दांसाठी
कोणाचीही,
निघून जाते एकटीच ती कळू न देता
शाईलाही