स्वागत करुया नववर्षाचे, मिळुनी सारेजण
विसरून जाऊ गतकाळातील कडवट ते क्षण
संचारू द्या शरीरामध्ये उत्साहाचे हो उधाण
त्या जोरावर करू मात अडचणीवर आपण
महागाईचा डोंब उसळला असे हो राज्यात
सोसण्यावाचून इलाज नसे तो आमुच्यात
जीभ चावली तरी, असतात आपुलेच दात
निवडले सरकार, आपणच हे मतदानात
टंचाई भासे आज आम्हांस वीज, पाण्यात
वाढीव कपात असे, कशी ती दिमाखात
स्विकारावे लागे दान, हो पडेल जे पदरात
तरी म्हणूया नवीन वर्ष जाईल ते सुखात
नकली दूध, नकली दाळ, विकती जनात
आरोग्याशी खेळून करती, वाढ नफ्यात
कर्जामुळे कृषिवल करती, हो आत्मघात
पिण्यास स्वच्छ पाणी, नसेल नववर्षात
माणूस होतो परिस्थितीने सवयीचा गुलाम
सहन करतो जोवर असेल, त्याच्यात त्राण
पेटून उठेल, जेंव्हा तुटेल त्याचा हा ताण
होईल ही किमया, या नववर्षात तू जाण