आयुष्याबद्दल आणखी एक

आयुष्यात असावेत काही फुटून ठिकऱ्या झालेल्या स्वप्नाचे तुकडे

त्यानेच येते त्या तुकड्यातही नवे चित्र पाहण्याची सौंदर्यदृष्टी

आयुष्यात मारावीच एकदा स्थैर्याची ऊब सोडून अनिश्चिततेच्या अंधारात उडी

त्यानेच येतो त्या अंधारातही प्रकाशाचा किरण शोधण्याचा चिवट आशावाद

आयुष्यात यावेच एकदा पायाखालची जमीन हादरवणारे अपयश

त्यानेच येते त्या जमिनीशी घट्ट नाते ठेवण्याचे शहाणपण

आयुष्यात नेहमीच असावी  थोडी अपूर्णता

त्यानेच येतो वर्तुळाची दोन टोके जोडण्याचा जन्मभर पुरणारा अट्टाहास