अस्तित्व

दृष्टिक्षेपात नसलेले क्षितिज,

मरुद्यनातिल ती आकस्मिक वीज,

अथांग सागराला भेदण्याची इच्छा,

पण का कुणास ठाऊक

अस्तित्व जाणण्यासाठीच ही सत्त्व परीक्षा?

सागरात तरंगणार एक ओंडका,

वालवी का लागत नाही?

सागवानाचा असावा, पण किंमत नाही!

का? अनाथ असावा, वालविही विचार करून पाही.......

दूरान्वयाने निर्माण झालेली दरी

वैचारिक, भावनिक न भारून निघणारी

उद्या काय? या प्रश्नाची मगरमिठी,

पंखात उरलाच नाही जोर, कशी मारू भरारी!

एकीकडे तोंड दबणारा दरारा ,

दुसरीकडे आपुलकी दाखवणारे कोल्हे,

वसंतात ऐकू येणारी कोकिळेची तान

नको नको वाटणारे ते आप्तेष्टांचे सल्ले.

वैचारिक गोंधळ , थांबलेल्या रक्ताचे ओघळ,

निर्णायक क्षणी कामी येणारा स्वभाव ,

विजयापेक्षाही गोड असणार पराभव,

पाण्याच्या प्रवाहाखाली झुकणारी लव........

को अहम प्रश्न सतत भेडसावतोय ?

प्रश्नाला उत्तर नाही ,का? असून सापडतं नाही!

कवच कुंडल गमावलेला हा कर्ण

कौंतेय का राधेय , प्रश्नाचे घाव सही

पण,का?