आज नवे ते उद्या जुने
होणार ते असतेची रे ।
नयन पुराणे झाले तरीही
नजर नेहमी नवीच हवी ॥
नव्याचा छंद धरताना
धंदा घडीचा करू नये ।
पुढच्या पिढीस रुचेल ते
स्वीकारण्या कचरू नये ॥
जुन्याला समजुनी कचरा
सारेच लाथाडू नये ।
सांवली देणाऱ्या तरूची
शाबूत ठेवावी मुळे ॥
उगवती सोनेरी जशी
मावळती सोनेरीच असते ।
प्रकाश-अंधाराची संध्या
मन उल्लसित करणारीच असते ॥