माळूनी मला तुझ्यात, मी गंधाळताना;
त्या छेडल्या स्वरांना, आलापून रात्र गेली.
तुझ्या आठवांचे पहारे,नेहमी मला छळताना;
विरहात तुझ्या मजला, बांधून रात्र गेली.
तुझ्या तनाचे उबारे, पांघरून घेताना;
तुझ्या मनाचे दुरावे, मोजून रात्र गेली.
तुझ्या सावलीची, अर्चना बांधताना;
तुझी मूर्ती पाषाणाची, घडवून रात्र गेली.
तुझ्या नसण्याचे मी, सत्य जाणताना;
शब्द ओठांतच माझ्या, अडवून रात्र गेली.
उसासे भरावे मी, वेदना लपवताना,
अश्रुफुलांचे निर्माल्य, विसर्जून रात्र गेली.
तुझ्या आठवांच्या कुपित, सुख शोधताना;
त्या सुखालाच माझ्या, हसून रात्र गेली.
चेहरा तुझा रोज, नव्याने ओळखताना;
विश्वासाची काच, तडकवून रात्र गेली.