आयुष्य म्हणजे कोडं आहे
सोडवाल तेव्हढं थोडं आहे
ज्याला सुटलं, सुखी झाला
ज्याला नाही, दुःखात बुडाला
कधी करा अडथळे पार
कधी शोधा फरक चार
एक अनेक प्रकार हजार
तुम्ही करत राहा विचार
एकात एक कोडी अनेक
तरीही वेगळं आहे प्रत्येक
काही सुटतात, काही सुटत नाहीत
नवीन पडायची काही थांबत नाहीत
काही कोड्यांना उत्तर नसते
काहींचे "उद्याच्या अंकात" मिळते
आपण कोडी सोडवत राहतो
नव्या कोड्यांची वाट पाहतो
नेहमीच पडावीत अशी कोडी
कधी जास्त, कधी थोडी
कोड्यांमुळेच आयुष्याला किंमत असते
कोडी सोडवण्यातच खरी गंमत असते