कृष्णविवरासम कृष्ण अभाळी
दोन काजवे मिणमिणणारे
तेवढ्यानेच कसे आश्वस्त
घनदाट वनात वाट चुकणारे
पावला पावला वरती पेरली
संकटांची अगणित स्फोटके
भयानकता सूचीत करती
मृत्यूची असंख्य द्योतके
कधी विझतील कुणास ठाऊक
श्वास त्यांचे पेटणारे
एक काजवा मन-बुद्धीचा
आणि दुसरा विश्वासाचा
एक जरी मालवला तरी
विचार संपेल निःश्वासाचा
अशा वनातूनी कसे तरतील
क्षणाक्षणाला धीर सुटणारे?
माझ्या इतर कविता