गडगडाट ऐकू आला, मजला हसण्याचा नभात
कारण कळले नाही मजला, पाहून ते अंबरात
हर्षवायू झाला होता हो, जलदांना खूप जोरात
आनंदाश्रूंनी भिजवले मग वसुंधरेस त्या सुखात
भिजली गेली प्रेमबीजे,या नभाच्या अश्रुपाण्याने
प्रेमांकुरे उपजली कुशीत, वसुंधरेच्या आनंदाने
हिरवीगार झाली होती, कशी वसुंधरा तारुण्याने
टवटवी आली होती अंगी, डोले धरा उत्साहाने
गाऊ लागली धरा, खळखळत्या अशा निर्झराने
तृप्त होती कर्ण ते, झुळझुळत्या मंजुळ गाण्याने
हळुच हसते वसुंधरा, अनेक फुललेल्या सुमनाने
मोहक हास्य धरेचे पहाताच, मन डोले आनंदाने
गमली मजला वसुंधरा बहरली असे तारुण्याने
आकंठ सौंदर्य पीत राहावे, डोळ्यांनी निवांतपणे
बदलत असती मोहक रुपे, शीतलशा पवनाने
शीळ घालुनी आकरितो, चित्त वसुंधरेचे खुणेने
पाहून सौंदर्य वसुंधरेचे, हर्षित होतो मी मनाने
विसरून जाई कष्ट, दिलेल्या व्यवहारी जगाने
वाटे राहावे सानिध्यात, लुटण्या सुख आनंदाने
रोज वाटे नवी वसुंधरा, बदलत असे ती रुपाने