रविवार, सुट्टीचा दिवस. सकाळी सगळं स्लो घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. मस्त वाफाळलेला चहा आणि सिगारेट घेऊन तो खिडकीपाशी बसला होता. म्यूझिक सिस्टिमवर संजीव अभ्यंकरांचा मंत्रमुग्ध करणारा भटियार चालू होता. चहाची वाफ आणि सिगारेटची धूम्रवलये ह्यांची कुस्ती बघण्यात तो गुंग होता. मध्येच संजीवच्या गायकीला दाद देत होता. शेवटी चहा संपला आणि सिगारेटचा विजय झाला. तसा तो व्हायचाच होता. कारण एक संपली तर दुसरी पेटवायला त्याला मनाई करणारं कोणी नव्हतं. खूप दिवसांनी मोकळा वेळ मिळाल्याने पेपर वाचवा आणि क्रॉसवर्ड मध्ये जाऊन यावं असं त्याने ठरवलं होतं. नवीन पिक्चरचा मुहूर्त होऊन, तो २ आठवड्यात फ्लोअरवर जाणार होता. ह्या दोन आठवड्यात खूप काम असणार होतं. त्या येणाऱ्या कामासाठी तो स्वतःला फ्लशआउट करत होता. स्टान्स घेत होता.
दरवाज्याची बेल वाजली. नोकराने दरवाजा उघडला. त्याने हसत गौतमचं स्वागत केलं. गौतम सोफ्यावर बसला, "मला माझी सीडी हवीय" म्हणाला.
"कोणती सीडी? " -तो
"शशी साल्या, बैजू बावरा. तुला देऊन २ महिने झाले. बायकोने निक्षून सांगितलं होतं तुला देऊ नको म्हणून; तरी मी दिली. "
"बैजू बावरा?? बघायला लागेल"
"अरे कालपासून तिला ऐकायची होती. मी काहीबाही कारणं देऊन टाळतोय.. तिला कळलं तर आकाशपाताळ एक करेल रे.. "
"बघतोsssssss"
ती सीडी ऐकून त्याला नक्कीच बरेच दिवस झाले होते, आता ती कोणत्या ढिगाऱ्याखाली असेल हे त्याला सांगता येणार नव्हतं. सीडीच्या कपाटाचा एक एक कप्पा रिकामा करून, सगळ्या सीडीज मधोमध, जमिनीवरच तो ठाण मांडून बसला. गौतमने डोक्याला हात मारला. आता २ तासांची निश्चिंती होती. बायकोला फोन करून तासाभरात येतो असं सांगून तो सोफ्यावरच मांडी घालून बसला. समोरच्या बुककेसमधून त्याने एक पुस्तक आधीच काढलं होतं. नोकराने गौतमसाठी चहाही आणला होता.
गौतमशी बोलता बोलता, सीडी, कॅसेटस चाळताना, मधूनच एखादी सीडी लावून पाहण्याचा मोह त्याला होत होता. पण संजीवचा राग फारच रंगत आला होता. त्याला आवडणारा त्रिताल चालू होता. गौतमही घाई करत होता. त्याला बायकोबरोबर लंचला जायचं होतं. शेवटी एकदाची गौतमची सीडी सापडली. ती नेताना, गौतम भटियारची सीडी आणि अर्धवट वाचलेलं पुस्तकही घेऊन गेला. २ महिन्यांचा करमणूक कर!
क्रॉसवर्डमध्ये जाऊन नवीन पुस्तक घेऊन येण्याचा प्लॅन, गौतमच्या येण्याने धुळीला मिळाला होता. आता ह्या सीडीज तरी आवराव्या म्हणून तो कामाला लागला. मध्येच नोकराला आवाज देऊन, दुपारी जेवायला घरीच असल्याचा सांगितलं. तो परत त्या सीडी सागरात बुडून गेला. भटियार गौतमने नेल्याने, रिकामी जागा भरण्यासाठी तो काहीतरी शोधात होता. मनासारखं, त्याहीपेक्षा मूडसारखं काही सापडत नव्हतं. एवढ्यात जुन्या कॅसेटच्या ढिगाऱ्यात एक "विसरशील खास मला" लिहिलेली कॅसेट नजरेस पडली. अक्षर ओळखीचं होतं. तिचं होतं. सिनेमाची रिळे फिरून फिल्म उलगडावी तश्या स्मृती उलगडू लागल्या. "स्मृती" च्या स्मृती उलगडू लागल्या. दिग्दर्शक म्हणून मानाने मिरवणारा स्वतःचा जीवनपट डोळ्यासमोर पाहून गोंधळून गेला. त्यातला त्याला काहीही एडिट करता येणार नव्हतं.. दुर्दैवाने.
***
चित्रकलेच्या वेडापायी त्याने जेजे मध्ये प्रवेश घेतला. तिथे असताना प्रो. दयालांनी तयार केलेल्या स्पेशल इंटरेस्ट ग्रुपचा तो अविभाज्य भाग होता. हा ग्रुप प्रो. दयालांच्या आर्ट क्लास मध्ये जमायचा. ग्रुप दर महिन्याला एक नवं challenge स्वीकारत असे. वेगवेगळे प्रवाह निवडून, विचारांची अभिव्यक्ती करायला शिकवणं हा त्या मागचा उद्देश होता. ह्या ग्रुपने त्याला पुरतं झपाटलं होतं.
शेवटचं वर्ष होतं. "हे challenge पार केलंत तर तीच माझी गुरुदक्षिणा असेल", प्रो. दयालांनी सांगितलं. Challenge च्या दिवशी प्रो. दयाल आले पण एकटे नाहीत. ती त्यांच्या बरोबर होती. सुंदर होती. रंगकर्मी विद्यार्थ्यांची उत्कंठामिश्रित भीती शिगेला पोहोचली. "आज तुम्हाला न्यूड पेंटिंग करायचं आहे" असं अनाउन्स केलं. पण एक अट होती, "सबजेक्ट शरीराने न्यूड असेल पण मन कव्हर्ड आहे. त्या मनाचे रंग दिसू द्या. तिच्या अंत:रंगाचे रंग दिसू द्या. " कॅनवास, पेन्सिल्स, रंग बाहेर आले. विद्यार्थी कामाला लागले. "अंतरंगाचे रंग कसे दाखवायचे? " मोठं challenge होतं.
ती कपडे उतरवून समोर बसली. तिला त्याचा सराव असावा. ती सुंदर होती. तिचा गव्हाळ सोनेरी रंग, पठडीतल्या सुंदरतेच्या परिमाणांना छेद देणारा. कमरेपर्यंत रुळणारे लांबसडक रेशमी केस. कमनीय शरीरात सौंदर्यस्थळे ओतप्रोत भरलेली. आखीव चेहऱ्याला किंचित न शोभणारी भेदक नजर... डायरेक्ट काळजाला हात घालणारी. ह्या सौंदर्याच्या पार कसं पाहायचं.. सगळ्यांना प्रश्न पडला होता... त्यालाही पडला. हातात पेन्सिल घेऊन तो कागदावर रेघोट्या ओढू लागला.
***
जेजे मधून पास झाल्यावर त्याने NSD मध्ये प्रवेश केला. सर्जनशीलतेमधले सगळे प्रयोग करून पाहायचं त्याने ठरवलं होतं. त्यात जे सगळ्यात जास्त आवडेल, त्याचा व्यवसाय करायचं त्याने ठरवलं होतं. पेंटिंग्ज विकून पैसेही मिळत होते त्याने फी भरली जात होती. NSD त खूप मित्र मिळाले. मैत्रिणीही.. ती परत भेटली.. त्याला सीनिअर होती.. NSD त फेमस होती हुशार आणि तीक्ष्ण म्हणून. त्याने तिला ओळखलं.. तिला जेजे मध्ये न्यूड केल्याची आठवण केली.
"न्यूड करायला कशी तयार झालीस? " असं विचारल्यावर म्हणाली,
"मी अभिनयाचं शिक्षण घेतेय. पहिल्याच वर्गात आम्हाला शिकवलं होतं की 'Don't be afraid of your body', म्हणून केलं. आणि फुकट नाही काही, प्रो. दयालांनी मला मोबदला दिला. एक सुंदर पेंटिंग!... पण तुझं काय झालं? तू झालास का पास? "
"हं"
त्यांची मैत्री घट्ट होती.. नजरेत भरण्याइतकी. तो दिग्दर्शनात होता, ती अभिनयात. दोघा एकमेकांना सर्वार्थी पूरक होते..
ती त्याच्याआधी पासआऊट झाली.. काम शोधत होती. वेगवेगळ्या निर्मात्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. तो तिला समजावयाचा, तू कोणाकडे जाऊ नकोस.. माझ्या चित्रपटात काम कर.
त्याच्या डोक्यात कथा होती.. पटकथा पण लिहून संपत आली होती. त्याला parallel सिनेमा बनवायचा होता. तो निर्माते आणि प्रायोजकांकडे चकरा मारत होता. एक निर्माता तयार झाला, सगळं फाईनल झालं. शोषितांच्या बंडावर चित्रपट निघणार होता "विषम" नावाचा. ती मुख्य अभिनेत्री होती. ती खूश होती... अभिनय करायला मिळणार म्हणून.
कास्टिंग झालं, मुहूर्त झाला, प्री-प्रोडक्शन मार्केटिंगसाठी फोटो-शूट चालू होतं. पूर्णांग झाकणारी साडी नेसूनही ती मादक कशी दिसेल ह्याची काळजी निर्मात्यांनी घेतली. ती खूश होती. त्याला ते पटत नव्हतं. त्याच्या चित्रपटात ते महत्त्वाचं नव्हतं. त्याच्या कथेची ती गरज नव्हती. त्याने विरोध केला. निर्मात्याला नवशिक्या दिग्दर्शकावर विश्वास नव्हताच. असंच चाललं तर पिक्चर चालण्याची खात्री कमीच होती. कथा, पटकथेचा मोबदला देऊन निर्मात्याने त्याची बोळवण केली.
ती पण सगळं सोडून येईल, त्याच्यासाठी तरी तसं करेल असं वाटलं. पण तिने नकार दिला. तिला ब्रेक हवा होता आणि तो मिळाला होता. महत्त्वाकांक्षा मैत्रीपुढे मोठी झाली होती.. प्रेमापुढे मोठी झाली होती... नंतर पिक्चर हिट झाल्याची बातमी आली पण आधी तो कोसळला होता.
***
त्याला सगळं आठवलं. ती कॅसेट तिची होती. तिने ध्वनिमुद्रित केलेली. तिची आवडती गाणी होती त्यात. "विसरशील खास मला" पण होत त्यात. पण तो तिला विसरला नव्हताच. सिनेमाचं रीळ जसं उलगडतं पण गुंता होऊ नये म्हणून लगेच फिल्म दुसऱ्या रिळाला गुंडाळतात, तसं त्याने ती कॅसेट तळाशी ठेवून सगळ्या सीडीज कप्प्यात कोंबल्या... परत वेळ काढून आवरायचं ठरवलं. उठून सिगारेट शिलगावली.
***
त्याचा "सबकुछ बिकाऊ है" नावाचा चित्रपट सुपरहिट झाला होता. चित्रपटाच्या निर्मात्याने घरी आज मेजवानी आयोजित केली होती. ह्या निर्मात्याने त्याच्या बरोबर काम करायची एक संधी दवडली होती. "सबकुछ बिकाऊ है" च्या निमित्ताने ते पहिल्यांदाच एकत्र आले होते. पण हा चित्रपट शेवटचा असू नये म्हणून निर्माता प्रयत्न करत होता. कसाही असला तरी शशी दर्जेदार चित्रपट देणारा दिग्दर्शक होता.
तो फार पार्ट्यांना जात नाही हे निर्मात्याला माहीत होतं म्हणून फक्त जवळच्या आणि चित्रपटाशी निगडित लोकांना निर्मात्याने बोलावलं होतं.
निर्मात्याने जातीने फिरून त्याला सगळं घर दाखवलं. घर मोठं आलिशान होतं... उंची फर्निचर आणि अप्रतिम कलाकृतींनी टेस्टफुली सजवलं होतं. निर्मात्याने आपल्या पेंटिंग्जचं कलेक्शन दाखवलं. एक पेंटिंग पाहताना तो बुचकळ्यात पडला. "हे कुठून आलं? "
"माझ्या एका मैत्रिणीचं आहे, स्मृती दर्शनचं. तिने गिफ्ट दिलंय, मी तिला ब्रेक दिला म्हणून", निर्माता म्हणाला.
त्याला शब्द सुचेनात.. ते त्याचं होतं. पण स्वाक्षरी त्याची नव्हती... त्याचं पेंटिंग... स्पेशल इंटरेस्ट ग्रुपचं.. न्यूड पेंटिंग.. 'एक भिंग' नावाचं... सुंदर कमनीय शरीरातून आरपार पाहणारं भिंग. बाह्य सौंदर्याच्या अंत:रंगातला दाहक अंगार दाखवणारं भिंग. त्याने साहलेला अंगार दाखवणारं भिंग... त्याच्या कॅमेऱ्याला ही नसलेलं... भिंग!
-संपदा म्हाळगी-आडकर १/१६/१०