नमस्कार!
मी 'तक्षशीलेच्या ऱ्हासाचे आख्यान' नावाचा एक संगीत दीर्घांक ( सपद्य दीर्घ एकांकिका ) लिहिला आहे.
त्यात काही अभंग व पदे आहेत. पैकी एक पद (संदर्भासाठी संवादासह) येथे आपल्या समीक्षणासाठी देत आहे -
नटः (ऐकण्याचा प्रयत्न करीत) छे! छे! हा खचितच भास असावा... माझ्या कानांच्या पडद्यामागे कोणी पिशाच्च, "कथा सांग... कथा सांग... " असा धोशा लावून मला वेडेपिसे करून सोडत आहे. (कानोसा घेऊन-) काय म्हणालास? तू पिशाच्च नाहीस? मग आहेस तरी कोण? काय? (आश्चर्याने-) अशक्य! केवळ अशक्य! भविष्यातून बोलणारा मानव आहेस तू? कीर्तनकार? हरिदास? म्हणजे कोण? भाट की विट? की विदुषक? की कथाकथी? काय म्हणालास? म्हटले तर सगळे एकत्र आणि म्हटले तर कोणीच नाही? मला समजले नाही... पण ते असो. तू माझ्या कानामागे ही कथेची भुणभूण काय म्हणून लावावीस? केवळ लोकरंजनासाठी? श्रोतृवृंदांची, रसिकांची साहित्यभूक भागावी यासाठी? साहित्य म्हणजे जे सर्वांचे हित साधते ते... तेच ना? की केवळ मनोरंजन? समाजरंजनातून लोकशिक्षण व्हावे असा कावा मनी धरून मी कथा सांगावी अशी तुझी अपेक्षा आहे काय? ही फोल अपेक्षा मुळीच मनात ठेवू नकोस. मनोरंजनातून कोणतेही विचार प्रसृत होत नसतात ही खूणगाठ मनात बाळगून ठेव. सामान्यजन पाहतात, ऐकतात, आनंद घेतात आणि विसरून जातात हे मी माझ्या आजवरच्या अनुभवातून सांगू शकतो -
पद -
स्मृती जनांची काही क्षणांची
त्वरित विस्मृती खोल व्रणांची
कथा ऐकिती, मोदन होते
विसरून जाती बोध शीघ्र ते
विचार कसले? केवळ रंजन
चर्वितचर्वण त्वरे विरेचन
नको करू तू व्यर्थ कामना
अभ्युदयाची वृथा वल्गना
कारण -
स्मृती जनांची काही क्षणांची
त्वरित विस्मृती खोल व्रणांची
तेव्हा तुझ्या मनात कथेतून लोकशिक्षणाचा हेतू असेल तर तो काढून टाक. तसा काहीच हेतू नाही म्हणतोस? काय? त्याची आवश्यकता तुझ्या काळी संपली आहे म्हणतोस? मग उत्तम आहे. असे असेल तर माझ्या सद्यस्थितीत जे घडत आहे तेच पाहा. तुला खचितच मनोरंजक वाटेल.
.....