रुतावे कुठे

न काट्यास कळले सलावे कुठे
रुतावे कुठे अन दुखावे कुठे


विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे

तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेची नशा आवरावी कुठे

सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

जयश्री