माळफुल

माळावरले रानफुल मी
गुदमरले या बगिचात,
रंग नसे ना रुप नसे मज
हिरमुसले फुलांच्या गलिच्यात...

होती रुक्षता अवती-भवती
हा ओलावा ही मज टोचतो,
रानवाऱ्याची सय असे मज
हळुवारपणाही जरा जाचतो...

सोनसळी किरणे जणू अंगावर पडली
ओळखीची झाक एका डोळ्यात दिसली,
नाजूकशी कळी ती बोलली हासून
रांगड्या तुझ्या गुणावर रे गेले मी भाळून...

मला ही भावले सलगीने तिचे वागणे
नाजूकशा स्पर्शाने तिच्या मी रोमंचित होणे,
लागली आंतरिक ओढ त्या कळीसाठीच ची
झाली ती ही थोडी बेधंद वेडीपिशी...

स्पर्शाने तिच्या झाले दगडाचे ही या सोने
नवी उभारी आली आणि नवेच होते अंकुरणे,
अवघा जन्म सरला माळावरल्या मुरुमात
शतदा उमलून मिटावे तिजसाठी या जन्मात...