अगतिक

डांबरी सडकेला सोडून बाजूला कच्च्या रस्त्याने थोडं आत गुपचूप गाव माझं,
सावत्र वस्ती, पडके देऊळ, मोडकी वेस, आतून पोखरलेल्या माड्यांचं ओझं.
रांगणारे पाय घेऊन परागंदा झालेला दाही दिशांना झेपावलेला हा जीव,
का डोळ्यांनी, कानांनी आणि रंध्रारंध्राने आतूर होतो जवळ आल्यावर शीव.
ओल्या डोळ्यांसोबत गहिवरलेले चेहरे थरथरते हात चेहऱ्यावर फिरणारे,
काळवंडलेले घरटे माझे करकरणाऱ्या दारांसोबत पाखरांसाठी झुरणारे.
थकलेल्या पायांचे ठणकणाऱ्या गुडघ्यांचे गाऱ्हाणे आभाळाला सांगणारे वाडे,
इतक्या काळाचे लिंपण तरीही दुभंग मिरवणारे आडवेतिडवे तडे.
मला निर्वासित बनवणारा भिरभिरवणारा इथल्या मातीचाच होता गुन्हा,
तरीही पंख वितळल्यावर उंची ओसरल्यावर मी होईन इथलाच पुन्हा.
सगळ्या तडफडीला थंड करून इथे खेचणाऱ्या रक्तापूढे मी अगतिक,
पाय पुढे टाकत टाकत मागची वाट चालणारा नि केविलवाणा पथिक.
***