स्वभाव खड्ड्यांचे

हसला एक वात्रट खड्डा गालावरच्या खळीप्रमाणे
वाहनांनी दिले अनेक झोकून, जीवास खुळ्याप्रमाणे

रुसला एक सज्जन खड्डा अन नको तेव्हढा फुगून बसला
समजुत काढणे अशक्य त्याची, डोहच तो होऊन बसला

तुंबलेला एक खड्डा अन वर पसरलेला तेलकट तवंग
सवंग कंत्राटदारांच्या नितीमत्तेचाच तो मळकट रंग

छीन्न विछीन्न एक खड्डा अन विस्कटलेला त्याचा  चेहरा
बुजवण्याच्या आर्त अपेक्षेने, विस्फारती त्याच्या नजरा

घुसमटलेला एक खड्डा होता धुळीमध्ये आकंठ बुडालेला
फसव्या सौंदर्याने त्याच्या, कित्येकांचा श्वासच कोंडला

खुनशी एक खड्डा, छदमी हसला, सावज येताना बघून
भयाण त्या जीवघेण्या आनंदाने घेई प्रत्येकास सामावून

देखणा एक खड्डा, आनंदला बघून पाठीराख्यांना
धडकली हृदये वाहनांची, अन ऊधाण सुचक संवादांना

सजला एक खड्डा, बसला देखण्या कट्ट्याच्या बाजुलाच
सावध करतो प्रेमी युगुलांना , सांभाळा,' नशिबात आता खड्डाच'

प्रत्येक महामार्गावर असेच जणू खड्ड्यांचे संमेलन
येथेच होई लबाड कोल्हे आणि लांडग्यांचे मनोमिलन