नशीब प्रत्येकाचे

एक शेंग ती नशिबाची
रांग आत पाच बियांची
सोसाट्याचा तो वारा
बसे झाडाला हादरा
झाली बियांची धावपळ
झाले अंतरंग गढूळ
निष्पर्ण झाड ते हतबल
शेंगेची उगिच खळखळ
शेंग वाऱ्याने उडाली
खडकावरती आदळली

एक बी वसे दगडावर
लढे नशिबाशी क्षणभर
   
दुसरी ती पक्षासोबत
दूरदेशी नशिब शोधत

 तीसरी पाण्यात पडली
 लोंढ्यासोबत ती गेली
            
 वाढ चौथीची खुंटली
 मोठ्या एका झाडाखाली
                  
 बी पाचवी ती वाढली
 आणि एक शेंग उगवली

तोच तो तुफानी वारा
झाला शेंगेचा चूरा

                एका गर्भातील पाच
                नशिबाचा वेगळा नाच.