करारपत्राच्या चिटोऱ्यावर;
आपण दोघानींही सह्या केल्या;
अकरा महिन्यांसाठीच का होईना;
नवराबायकोच्या भूमिका पत्करल्या.
तो करार ठरत होता जोखड;
आपण दोघांनीही मानेवर घेतलेलं;
अति महत्त्वाकांक्षेच्या नादात;
आपण जगालाच वेडं ठरवलेलं.
खरंतर आपलं हे नातं;
बघायला गेलं तर नाईलाजाचंच होतं;
थोडं तुझ्या फायद्याचं अन्;
थोडं माझ्याही फायद्याचं होतं.
आपल्या दोघांचं एकाच घरात राहणं;
भावनेला अडवत शब्दांना नाचवणं;
तुझं नि माझं हे नातं निभावणं;
अन् झालेल्या कराराची आठवण ठेवणं
भावनांच्या कोंडाळ्यात पडतो एखादा प्रश्न.
कशासाठी करायचं हे सारं?
जगाला फसवत; स्वतः फसत;
कशासाठी पेलायचं हे ओझं?
का धमकच नव्हती आपल्यात;
नाही पटलं तर जुळवून घ्यायची;
अन् दोघांनीही केलेली चूक;
दोघांनीच सावरायची.
हळू हळू आपल्याला समजत जाईल;
लागतच थोडसं दुःख संसार गोड करायला;
म्हणून तर टाकतो आपण मिठाची चिमुट;
गोड सरबताला चव आणायला.
कदाचित कळेलही या करारानंतर;
जुळतील आपले सूर आयुष्याच्या सतारीवर;
पण नंतर शरीराने एकत्र येउनसुद्धा;
आपली मनं मात्र राहतील काठावर.
आता फक्त इतकच कळतंय;
जगाचे नियम टाळताना आपले अपवाद झाले होते;
करारपत्राप्रमाणे लग्न जगताना;
सप्तपदी अन् अक्षतांचे दुष्काळ सोसले होते.