चाकरमाने

लोकलच्या गर्दीत कोंबले चाकरमाने
किडे-मुंग्या होत चालले चाकरमाने

गाडीमध्ये बूड टेकण्या जागा मिळता
धृवपदावर जणू पोचले चाकरमाने

"आज जरा जास्तीच वाटते गर्दी, नाही? "
घामेजुन हे रोज बोलले चाकरमाने

लाल फुल्या आधीच दोनदा झाल्या त्यांच्या
मस्टर गाठायास धावले चाकरमाने

"आज घरी या लवकर, बाबा", लेक बोलली
फोन ठेवला आणिक रडले चाकरमाने

पुन्हा योजना "स्वेच्छा"निवृत्तीची आली
साहेबाने पुन्हा मोजले चाकरमाने

अवघड जाते नव्या युगाशी जमवुन घेणे
'खा. जा. उ.*' त, जात्यात भरडले चाकरमाने

उडू लागला विमानातुनी 'शायनिंग' भारत
'सायडिंग'च्या गाडीस लोंबले चाकरमाने

प्रवास करुनी अगणित मैलांचा जीवनभर
जेथे होते तिथेच उरले चाकरमाने

* : खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण