समुद्र
एक तैलबिंदू
पसरला जळी
वर तरंगला
डोहभर॥
थेंबे विस्तारीता
पाण्यासी झाकले
जळाची ओळख
संपली गा॥
जळी तूपथेंब
गोठोनि कोंडला
जरी तरंगला
संकोचून॥
जळी पडे मीठ
मूठ वा चिमूट
एकरूप झाले
जळभर॥
अहंकार तैल
न्यूनगंड तूप
नको ते व्यापार
आत्मतत्त्वी॥
सात्मीभाव व्हावा
मीठ-जळाजैसा
तेव्हाचि समुद्र
होईल की॥