आदिमाते, जगदंबे तू निर्मिली ही सृष्टी
दुष्टांपासून देई मुक्ती, करावी कृपादृष्टी
पूजता तुला भावे,देशी आम्हां नवी दृष्टी
अशीच असू दे कृपा, आम्ही होऊ तुष्टी
आलो पाहण्या देवी, पवित्र करवीरनगर
लांबूनच दिसे लक्ष्मी, तुझे मंगल मंदिर
प्रवेश करताच मंदिरी, दिसते मेघडंबर
मध्ये दिसले मजला, तुझे ध्यान हे सुंदर
सत्त्व,रज,तम,ह्या त्रिगुणाचे आदिस्थान
शरणागत भक्तांना,देशी प्रेमे अभयदान
काळ्या रत्नशीलेत, घडवले तुझे ध्यान
दक्षिणकाशी, म्हणे करवीर असे स्थान
असू द्यावी कृपा, मजवरी हे लक्ष्मीमाते
येते हिंमत लढण्या, जगी तव वरदहस्ते
ठेवतो पवित्र तव छबी,माझ्याच ह्रदयाते
घेतो आता निरोप,जातो तुळजापुरी,माते