चूक

कोणी चूक विकत द्याल का हो चूक
आधी काय तो कांगावा नंतर मात्र चिडीचूप..

मी चूक केली म्हणायला कोणी पुढे धजावत नसतं
बरणीतलं तूप खरंतर आपल्याच मिशीला लागलं असतं
चुकीची कारणं मग नंतर चिकाटीने शोधली जातात
आपल्या डोईची खापरं दुसर्‍याच्या माथी फोडली जातात

बजावणी होते सांगायला पुन्हा घडू नये भूल
वरच्या पट्टीतली बरोबर असतेच की हूल
माणूसच चुकतो हे एरवी विसरतं भोवतालचं जग
स्वत:च्या पाठीला लागते तेव्हाच जाणवते ती रग

महागात पडतात (चुका) काहींना, काही सुटतात देखील स्वस्तात
किमतीच तेवढ्या कमी-जास्त भोग कोणाला सुटत नसतात
चुकांचा ही केला जातो म्हणे परलोकी तोल-मोल
ज्याच्या जास्तं तो अव्वल इतर सगळे फोल.

कोणी चूक विकत द्याल का हो चूक...