पानावर हिरव्या ओल्या
थेंब हळू थरथरतो
आकाशी मेघ काळा
मग दूर दूर जातो ।
लाटांवर सळसळतो
गर्द केशरी वर्ख
अन मनातही उपजतो
आठवांचा विखारी डंख ।
थबकते सांज क्षणभर
निळसर जलाशयावर
हळुवार एक उसासा
निसटतो तप्त धरेतून ।
चमकतो गगनी तारा
अन शीळ घुमवितो वारा
डोळ्यात माझ्या अवचित
झाकोळ कुठुनसा येतो ।